ठाकरे – पवार सरकारमधील मंत्र्यांची अधिकाऱ्यांच्या बदल्यांमधून प्रचंड कमाई; सीआयडी चौकशीची चंद्रकांत पाटलांची मागणी

  • बदल्या न करण्याचा अजित पवारांचा निर्णय उद्धव ठाकरे यांचा निर्णय फिरवला
  • कोरोना काळात मर्जीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या करून पैसा गोळा केल्याचा गंभीर आरोप

विशेष प्रतिनिधी

मुंबई : ठाकरे – पवार सरकारच्या मंत्र्यांनी अधिकाऱ्यांच्या १५% बदल्यांच्या नावाखाली अनेक “मलाईदार ठिकाणी” मर्जीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या करून प्रचंड पैसा गोळा केला आहे, असा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. या प्रकरणाची सीआयडी चौकशी करावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

पाटील म्हणाले, “उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अर्थ खात्याने बदल्या करू नयेत, असा आदेश दिला असतानाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सामान्य प्रशासन विभागाने बदल्यांवरील स्थगिती उठवली, हे आश्चर्यकारक आहे. राज्य सरकारने करोनामुळे बदल्या रोखल्या होत्या पण नंतर १५% बदल्यांना परवानगी देऊन त्यावरील स्थगिती उठविली.

परिणामी ठाकरे – पवार सरकारच्या मंत्र्यांनी “मलाईदार ठिकाणी” बदली करून देण्याचा बाजार मांडला. यामध्ये फार मोठ्या रकमेची उलाढाल झाली. ज्यांचे राजकीय लागेबांधे नाहीत आणि ज्यांच्याकडे आर्थिक बळ नाही अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांवर यामध्ये अन्याय झाला आहे. या सर्व प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची गरज आहे.”

मुळात कोरोनाविषयीच्या उपाययोजनात सातत्य राखण्यासाठी चालू आर्थिक वर्षात बदल्या करू नयेत, असे सरकारचे मे महिन्यात धोरण होते. तर जुलै महिन्यात राज्यातील कोरोनाची साथ अधिक गंभीर झाली असताना एकूण कार्यरत पदांच्या १५% बदल्या करण्याचा आदेश देण्याचे कारणच नव्हते. त्याला १० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचेही कारण नव्हते.

राज्य सरकारच्या या धोरणातील गोंधळामुळे कोरोनाचे संकट असताना मोठ्या संख्येने अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबाचे स्थलांतर करण्याची वेळ आली. करोनामुळे शाळा बंद असताना मुलांसाठी नव्या ठिकाणी शाळेत प्रवेश मिळविण्याचे आव्हानही निर्माण झाले. तसेच करोनाची साथ रोखण्याच्या प्रयत्नांमध्येही अडथळा आला, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

कोरोनाच्या महासाथीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत राज्य सरकारच्या अर्थ विभागाने ४ मे रोजी एक शासन निर्णय जाहीर केला आणि त्याअंतर्गत अनेक निर्बंध लादले. यामध्ये म्हटले होते की, चालू आर्थिक वर्षात कोणत्याही संवर्गातील अधिकारी अथवा कर्मचारी यांची बदली करू नये, याविषयीचा आदेश सामान्य प्रशासन विभागामार्फत देण्यात येईल.

करोनाच्या अनुषंगाने विविध विभागांनी केलेल्या उपाययोजनांमध्ये सातत्य राहणे आवश्यक आहे, असे कारण बदल्यांवर बंदी घालण्यामागे देण्यात आले होते. दरम्यान, सामान्य प्रशासन विभागाने अर्थ विभागाच्या ४ मे रोजीच्या आदेशाच्या अनुषंगाने ७ जुलै रोजी आदेश काढला व ३१ जुलैपर्यंत पंधरा टक्के बदल्या कराव्यात असे स्पष्ट केले. तसेच नंतर २३ जुलै रोजी आणखी एक आदेश काढून बदल्यांची मुदत १० ऑगस्ट केली. हा बदल्यांच्या धोरणातील विलंब आणि गोंधळ असल्याची टीकाही चंद्रकांत पाटील यांनी केली.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*