चीनी तंबू काढताना पेटल्यामुळे हिंसक संघर्ष; भारतीय जवान चीनी सैनिकांवर भारी पडल्याने ४० चीनी सैनिकांचा मृत्यू

  • गलवान संघर्षाबाबत केंद्रीय मंत्री – माजी लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंह यांचा गौप्यस्फोट

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : “भारत – चीन चर्चेत सैन्य माघारीचा निर्णय झाल्यानंतरही सीमेजवळ चीनचा तंबू दिसला. भारतीय गस्ती पथकाने तो काढायला सांगितला. चीनी सैनिक तंबू काढत असताना त्याला अचानक आग लागली. भारतीय सैनिकांनीच आग लावल्याचा चीनी सैनिकांना संशय आला. त्यातून गलवानमध्ये हिंसक संघर्ष झाला. या संघर्षात भारतीय जवान चीनी सैनिकांना भारी ठरले आणि ४० हून अधिक सैनिक ठार झाले. हे सत्य आहे,” असा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री आणि माजी लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंह यांनी केला आहे.

१५ जूनच्या रात्री पूर्व लडाखमधील गलवान व्हॅलीत भारत-चीन सैन्यात रक्तरंजित संघर्ष झाला. या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले होते. त्यानंतर दोन्ही देशातील संबंधही कमालीचे ताणले गेले. चीन सैन्याने भारतीय हद्दीत शिरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संघर्ष झाला, अशी अधिकृत भूमिका केंद्र सरकारने घेतली. मात्र, व्ही. के. सिंह यांनी संघर्षाबद्दल मोठा गौप्यस्फोट केला.

एबीपी न्यूज या वृत्तवाहिनीशी जनरल व्ही. के. सिंह यांनी संवाद साधला. ते म्हणाले, “लेफ्टनंट जनरल स्तरावरील चर्चेत भारत व चीनमध्ये हा निर्णय झाला होता की, सीमेजवळ दोन्ही देशांचे जवान राहणार नाहीत. पण, त्यानंतर १५ जूनच्या सायंकाळी कमांडिंग ऑफिसर सीमेवर टेहाळणी करण्यासाठी गेले, तेव्हा त्यांना चीनी सैन्य पूर्णपणे परत गेले नसल्याचे लक्षात आले.

पेट्रोलिंग पॉइंट १४ जवळ चीनी सैन्याचा तंबू तसाच होता. त्यानंतर भारतीय कमांडिंग ऑफिसरने चीनी सैन्याला तंबू हटवण्यास सांगितलं. चीनी सैन्य तंबू काढत असतानाच त्याला अचानक आग लागली. भारतीय जवानांनी ही आग लावल्याचा संशय , असं ची सैनिकांना आला. त्यानंतर दोन्ही देशातील जवानांमध्ये हिंसक संघर्ष झाला. या संघर्षात भारतीय जवान चीनी सैनिकांवर वरचढ ठरले. दोन्ही देशांनी अधिकची कुमक बोलावली. या हिंसक संघर्षात चीनचे ४० पेक्षा जास्त जवान मारले गेले, ही गोष्ट खरी आहे.”

व्ही. के. सिंह यांच्यासारख्या जबाबदार केंद्रीय मंत्र्यानी आणि माजी लष्करप्रमुखांनी दिलेल्या माहितीला राजनैतिक आणि सैनिकी दृष्टीने वेगळे महत्त्व आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*