चीनची तिहेरी चाल : भारताशी चर्चा; पाकिस्तान बरोबर सैन्य तैनाती; पाक दहशतवाद्यांनाही चिथावणी

  • चीन – पाकिस्तानला तोडीस तोड उत्तरासाठी ३० हजार भारतीय सैनिक सज्ज
  • चीनच्या मदतीला पाकिस्तानने उत्तर लडाखमध्ये पाठवले २० हजार सैनिक
  • चीनची काश्मीरमधल्या दहशतवादी संघटनेबरोबर चर्चा

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारतावर दबाव वाढविण्यासाठी चीनने तिहेरी चाल रचली असून एकाच वेळी भारताला चर्चेत गुंतवून ठेवणे, पाकिस्तानला हाताशी धरून सीमाभागात सैन्य तैनाती वाढविणे आणि पाकिस्तानी दहशतवाद्यांना कारवायांसाठी चिथावणी असे तिहेरी आव्हान भारतापुढे उभे करत आहे. अर्थात जुने passive धोरण सोडून भारतानेही आक्रमकपणे ही चाल मोडून काढण्यासाठी धोरण आखले आहे.

माऊंटन फोर्सच्या बरोबरीने सीमेवर भारताने ३० हजार सैन्य तैनात केले आहे. सैनिकी आणि गुप्तचर सूत्रांनी ही माहिती दिली आहे. पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी चीनने भारताबरोबर चर्चा सुरू ठेवली आहे चीनमध्ये त्याचवेळी पाकिस्तानला गिलगिट-बालटिस्तान भागात २० हजार सैन्याची तैनाती करण्यास सांगितले आहे आणि जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाला खतपाणी घालण्यासाठी चीनी लष्कराने अल बदर या दहशतवादी संघटनेबरोबर चर्चा केल्याची माहिती आहे. इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर लडाखमध्ये पाकिस्तानने २० हजार अतिरिक्त सैन्य तुकडया पाठवल्या आहेत. या भागातील चिनी सैनिकांइतकीच ही संख्या आहे. भारताची कोंडी करायची. एकाचवेळी भारतावर दोन्ही बाजूंनी हल्ला करण्याची संधी कधी मिळते? पाकिस्तान त्या प्रतिक्षेत आहे असे सूत्रांनी सांगितले.

चीन आणि पाकिस्तानकडून असलेल्या धोक्याचे मूल्यमापन करण्यासाठी भारतीय लष्करी अधिकारी आणि गुप्तचर यंत्रणांमध्ये बैठकांचे सत्र सुरु आहे. चीनला मदत करण्यासाठी म्हणून पाकिस्तानच्या आयएसआयकडून काश्मीर खोऱ्यात दहशतवादी कारवायांना आणखी खतपाणी घातले जाण्याची शक्यता आहे. प्रशिक्षित बॅटचे दहशतवादी पाठवले जाऊ शकतात.

काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधात मोठी मोहीम उघडली आहे. आतापर्यंत दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. बहुतेक जिल्हे दहशतवादमुक्त होत आहेत. नेमके हेच चीन आणि पाकिस्तानला नको आहे.

त्यामुळे स्थानिक दहशतवाद्यांच्या मदतीने काश्मीरमध्ये सुरक्षा दलांवर सुद्धा हल्ले घडवून आणण्याचा डाव आहे. यात चीनी लष्करही सामील झाले आहे. भारत आणि चीनच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांमध्ये काल चुशुल येथे तब्बल दहा तास बैठक चालली. यामध्ये पूर्व लडाखमध्ये तणाव कसा कमी करायचा, यावर प्रामुख्याने चर्चा झाली.

कराची स्टॉक एक्सचेंज हल्ल्यासाठी पाकिस्तानने भारताला धरले जबाबदार दोन दिवसांपूर्वी कराची स्टॉक एक्सजेंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यासाठी पाकिस्तान भारताला जबाबदार ठरवण्याचा प्रयत्न करत आहे. पण पाकिस्तानचा हा आरोप संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील अन्य देशांना मान्य नाहीय. त्यामुळेच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून या हल्ल्यासंबंधी अजून कुठलेही वक्तव्य समोर आलेले नाही. यूएनएससीकडून पत्रक जारी करायला विलंब झाला आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*