चिनी सैन्याची पुरती हेकडी काढली; भारतीय सैन्याने गालवन नदीवरील पूलाचे बांधकाम ७२ तासांत केले पूर्ण…!!


  •  भारतीय सैन्य दलाच्या इंजिनिअर्सचा भीम पराक्रम; हिंसक संघर्षातही कडाक्याच्या थंडीत कामगिरी फत्ते…!!
  •  चिनी दादागिरीला खणखणीत उत्तर

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली / लडाख : भारत – चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्य दलाच्या इंजिनिअर्सनी भीम पराक्रम करून दाखवला आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गालवन नदीवरील पूलाचे बांधकाम या इंजिनिअर्स आणि कामगारांनी अवघ्या ७२ तासांमध्ये पूर्ण केले. ज्या पूलाचे काम होऊच नये यासाठी चिनी सैन्याने जंग जंग पछाडले. भारतीय सैन्याची कुरापत काढून हिंसक संघर्ष केला, त्या चीनचे सगळे मूसळ केरात गेले. भारतीय सैन्याने गालवन नदीवरील पुलाचे बांधकाम पूर्ण करून घेत महत्त्वाची कामगिरी फत्ते केली.

गालवन खोऱ्यात १५ जूनच्या रात्री भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी तेथे अत्यंत तणावाची स्थिती असतानाही भारतीय रणनैतिक सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या ठरणाऱ्या या पूलाचे बांधकाम पूर्ण केले म्हणून इंजिनिअर्स आणि कामगारांच्या या कामगिरीला भीम पराक्रम मानण्यात येत आहे. इंजिनिअर्सना गलवान नदीवरील पुलाचे बांधकाम वेगाने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले होते.

६० मीटर लांबीच्या या पुलामुळे भारतीय सैन्याच्या तुकडयांना अत्यंत वेगाने नियंत्रण रेषेजवळ पोहोचता येईल. गुरुवारी दुपारी हा पूल बांधून पूर्ण झाला. लष्कराच्या इंजिनिअर्सनी दोन तास या पुलावर वाहनांची चाचणी घेतली. या पुलामुळे भारतीय लष्कराला नियंत्रण रेषेजवळ वेगाने हालचाल करता येणार, हे चीनला ठाऊक होते. त्यामुळे त्यांनी या पूल बांधणीला प्रचंड विरोध केला होता. पण भारताने चीनच्या दादागिरीला कुठेही किंमत न देता अत्यंत वेगाने हा पूल बांधून पूर्ण केला. हा पूल एक प्रकारे चीनच्या दादागिरीला खणखणीत उत्तर आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

सोमवारी रात्री या पुलापासून काही अंतरावरच मोठा रक्तरंजित संघर्ष झाला होता. लष्कराच्या कारू येथील माऊंटन डिव्हिजनने सैन्याच्या इंजिनिअर्सच्या युनिटला अजिबात विलंब न लावता लवकरात लवकर या पुलाचे बांधकाम पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. रणनैतिक दृष्टीने हा पूल महत्वाचा असल्याने सैन्य तुकडयांना बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी इंजिनिअर्सना मजबूत सुरक्षा प्रदान करण्याचे आदेश देण्यात आले होते. मंगळवारी आणि बुधवारी रात्री अत्यंत कडाक्याच्या थंडीतही काम न थांबता, न थकता या पुलाचे बांधकाम सुरू होते.

भारतीय सैन्य दलाचे कमांडर मेजर जनरल अभिजीत बापट १६ जून रोजी सकाळी पेट्रोल पॉईंट १४ जवळ चिनी सैन्य अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी पोहोचले. त्यावेळी त्यांना या पुलाच्या बांधकामात कितपत प्रगती झालीय, त्याची माहिती देण्यात आली. कुठल्याही परिस्थितीत काम थांबवायचे नाही हा आदेशच इंजिनिअर्सना देण्यात आला होता.

भारताकडून या भागात इन्फ्रस्ट्रक्चर उभारणीचे जे काम सुरू आहे, त्यात या पुलावर चीनचा मुख्य आक्षेप होता. या पुलामुळे भारतीय लष्कराची क्षमता वाढणार हे त्यांना ठाऊक होते. त्यामुळे हा पूल उभारायला त्यांचा विरोध होता. पण आता हा पूल बांधून पूर्ण झाला असून इथून वाहतुकही सुरू झाली आहे. श्योक नदीच्या पूर्वेला डीएसडीबीओ रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. त्यावरही चीनला आक्षेप आहे. या पूल आणि रस्त्यामुळे फक्त गालवन खोऱ्यातच नाही तर उत्तर सेक्टरमध्येही भारताला सहजतेने हालचाल करता येणार आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था