- नियोजित वेळेपेक्षा महिनाभर आधीच फ्रान्स विमाने सुपूर्द करणार
- ऑगस्टमध्ये कुठल्याही लढाईसाठी सज्ज असेल राफेल फायटर
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : कोणत्याही युद्धामध्ये “गेमचेंजर” ठरणारी राफेल फायटर विमानांची पहिली तुकडी येत्या २७ जुलै रोजी भारतात दाखल होत आहे. नियोजित वेळेपेक्षा महिनाभर आधी राफेल विमाने भारतात दाखल होणार आहेत.
भारतीय हवाई दलाच्या अंबाला एअर बेसवर राफेलची पहिली तुकडी तैनात होईल. फ्रान्सच्या इस्ट्रेसवरून सहा राफेल विमाने भारतात दाखल होतील. भारतीय वैमानिक एकाच उड्डाणात ती फ्रान्समधून भारतात आणतील.
राफेलची गोल्डन अॅरो स्क्वाड्रन ऑगस्टमध्ये कुठल्याही लढाईसाठी सज्ज असेल. चीन बरोबरच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राफेल विमाने भारतीय हवाई दलात दाखल होणे ही व्यूहरचनात्मक दृष्ट्या महत्त्वाची बाब आहे. चीनसाठी एक धोक्याची घंटा आहे. इंडिया टुडेने ही बातमी दिली आहे. चीन-पाकिस्तानकडे राफेलच्या तोडीचे कुठलेही फायटर विमान नाही.
चीन सीमेवर मोठ्या प्रमाणावर युद्ध सामग्री जमवून तयारी करत असताना भारताचीही तयारी कुठेही कमी नाही.
राजनैतिक पातळीवर द्विपक्षीय चर्चांमधून रशिया, अमेरिका, इस्रायल, फ्रान्स भारताला सामरिक मदत करायला तयार झाले आहेत. याच वाटाघाटींमधून नियोजित वेळेपेक्षा आधी महिनाभर फ्रान्स राफेल विमानांची तुकडी भारताला देण्यास तयार झाला आहे.