खासदार संजय जाधवांच्या तक्रारीची दखल; परभणीत मुख्यमंत्र्यांचा राष्ट्रवादीला झटका

  • जिंतूर बाजार समितीच्या अशासकीय प्रशासक मंडळाला स्थगिती

वृत्तसंस्था

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय जाधव उर्फ बंडू जाधव यांच्या राजीनामा नाट्यानंतर परभणीत शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसला झटका दिला आहे. संजय जाधव यांच्या नाराजीचा केंद्रबिंदू राहिलेल्या जिंतूर-मानवत बाजार समिती अशासकीय प्रशासक मंडळाच्या स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा स्थगिती आदेश दिला आहे.

उद्धव ठाकरे यांनी जिंतूर-मानवत बाजार समितीच्या अशासकीय प्रशासक मंडळाच्या नियुक्तीला तात्पुरती स्थगिती दिली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या प्रस्तावावर निर्णय घेताना उद्धव ठाकरे यांनी हा स्थगिती आदेश दिला. चारच दिवसांपूर्वी २५ ऑगस्टला संबंधित अशासकीय प्रशासक मंडळ नेमण्यात आले होते. त्यानंतर परभणी शिवसेनेतून याविरोधात मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त करण्यात आली होती. कार्यकर्त्यांची नाराजीचे कारण देत खासदार संजय जाधव यांनी देखील आक्रमक होत राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला. यानंतर ठाकरे – पवार सरकारमधील मतभेदाच्या चर्चेला उधाण आले.

राजीनामा नाट्यानंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी हस्तक्षेप करत संजय जाधव यांच्याशी चर्चा केली. त्यांची मुख्यमंत्र्यांशी देखील भेट करवून दिली. मुख्यमंत्र्यांनी संजय जाधव यांच्या अडचणी समजून घेत त्यांची नाराजी दूर केली. आता या निर्णयाने उद्धव ठाकरे यांनी परभणीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्चस्वाला धक्का दिल्याची चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादीची यावर प्रतिक्रिया अपेक्षित आहे.

खासदार संजय जाधव मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात नेमके काय म्हणाले होते?

जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर शिवसेनेचे अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्त करण्यासाठी मी मागील ८ ते १० महिन्यांपासून आपल्याकडे पाठपुरावा करीत आलो आहे. पण जिंतूरला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नसताना पहिल्यांदा त्यांचे अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आले. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. त्यावेळेला पुढच्या वेळेस आपल्याला संधी मिळेल असे म्हणून आपल्या कार्यकर्त्यांनी कशी-बशी समजूत काढून मी शांत बसलो.

दरम्यानच्या काळात जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर यावेळेस तरी शिवसेनेचे प्रशासक मंडळ नियुक्त करावे, म्हणून मी आपल्याकडे सतत पाठपुरावा करीत राहिलो. मात्र याही वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रशासक मंडळ नियुक्त केले. ही बाब माझ्या मनाला फारच खटकली असून कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले आहेत. आपले सरकार असताना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना जर मी न्याय देऊ शकत नसेल तर खासदार पदावर राहण्याचा मसा मुळीच नैतिक अधिकार नाही, असे मला वाटते”, असं संजय जाधव म्हणाले.

शेवटी मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. तेव्हा कार्यकर्त्याला पदावर जाण्याची संधी आणि न्याय मिळत नसेल तर माझी खासदारकी काय कामाची? खासदार पदावर राहण्याचा मला कसलाही नैतिक अधिकार नाही. या मताचा मी आहे. शिवसैनिकांना न्याय मिळत नसेल तर संघटना कशी वाढेल?

जिल्ह्यातील भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे अनेक जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक यांच्यासह अनेक पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करण्यास इच्छूक आहेत. मात्र, मी आपल्याच पक्षातील कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकत नसेन तर इतर पक्षातील लोकांना शिवसेनेत आणून काय न्याय देऊ शकेन? असा प्रश्न मला पडला आहे.

जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर शिवसेनेचे अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्त करण्यासाठी खासदार म्हणून मी सतत पाठपुरावा करूनही दुसऱ्यांदाही राष्ट्रवादी काँग्रेसचेच प्रशासक मंडळ नियुक्त केल्याने शिवसैनिकांवर पुन्हा अन्याय झाला आहे. ही बाब माझ्या मनाला अत्यंत वेदना देत आहे. खासदार म्हणून मी जर कार्यकर्त्यांना न्याय देत नसेल तर मला खासदार म्हणून राहण्याचा नैतिक अधिकार उरत नाही. तेव्हा पूर्ण विचारांती आणि राजखुशीने मी खासदार पदाचा राजीनामा आपल्याकडे देत आहे. मी शिवसैनिक म्हणून काम करेन. तरी माझा खासदारकीचा राजीनामा मंजूर करावा, ही विनंती.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*