- निर्मला सीतारामन रामन यांच्यानंतरचा “बुद्धिवादी” दावा
वृत्तसंस्था
मुंबई : निर्मला सीतारामन यांचे “अँक्ट ऑफ गॉड” नंतर प्रकाश आंबेडकरांनी नवे अजब तर्कट लढवले आहे. म्हणे, कोरोनामुळेच मृत्यूच होत नाहीत. झालेले मृत्यू नैसर्गिकच आहेत…!! व्वा…!! २१ शतकातल्या तथाकथित बुद्धिप्रामाण्यवादी नेत्यांचे हे “संशोधन”
देशात दररोज हजारोंच्या संख्येने कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. तर मृत्यू होणाऱ्या रुग्णांचा आकडाही मोठा आहे. कोरोनामुळे देशात ६४ हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले आहे. मात्र, प्रकाश आंबेडकर यांना हे मान्यच नाही. “करोनामुळे मृत्यू होत नाहीत, सर्व मृत्यू नैसर्गिक आहेत,” असा अजब दावा त्यांनी केला आहे. कोरोना आहे, यावरही आपला विश्वास नसल्याचे तर्कटही आंबेडकरांनी लढवले आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी ‘बीबीसी मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत हे विधान केले आहे. प्रकाश आंबेडकर यांनी धार्मिक स्थळे खुली करण्याच्या मागणीसाठी पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरासमोर आंदोलन केले होते. त्यानंतर दिलेल्या मुलाखतीत त्यांनी करोना आणि परिस्थितीवर भूमिका मांडली.
“धार्मिक स्थळे खुली करण्यामागे तुमची नेमकी भूमिका काय आहे? गर्दी होऊ नये असे प्रयत्न केले जात असताना अशी मागणी का केली जात आहे?’ असा प्रश्न आंबेडकर यांना विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, “सरकारला कोरोनाविषयी काहीही कल्पना नाही, असे मला वाटते. दुकाने सुरू करण्यासाठी, एसटी सुरू करण्यासाठी, प्रत्येक गोष्टीसाठी आंदोलन करावं लागत आहे.
आज मंदिरं उघडा, यासाठी आंदोलन केले. हे शासन करोनाच्या नावावर लोकांना फसवत आहे. कोरोना आहे, यावर माझा विश्वास नाही.” केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनाही मागे टाकणारे आंबेडकरांचे हे तर्कट आहे. सीतारामन यांना कोरोना “देवाची करणी” वाटते, तर आंबेडकरांचा कोरोनावर वैद्यकीयदृष्ट्याच विश्वास नाही.
‘कोरोनामुळे लोकांचा मृत्यू होतोय हे तुम्हाला का मान्य नाही?’ या प्रश्नावर भूमिका मांडताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, “जो माणूस जन्माला आला, त्याचा मृत्यू एक दिवशी होणारच. जर दहा कोटी लोकांमध्ये दोनशे अडीचशे लोकांचा मृत्यू झाला, तर त्यात नवीन काय आहे? भारतीय स्वत:शी तर लढत असतात, पण निसर्गाशी लढण्याचा आव आणत असतो. यापेक्षा मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू झाला, तर मी मान्य करेल.
करोनामुळे हे मृत्यू होत नाहीत. सर्व मृत्यू नैसर्गिक आहेत. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे व्यक्तीचा मृत्यू होत असल्याचा काय पुरावा आहे? पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे का, की करोनामुळे मृत्यू झाला आहे? माझा यावर आजिबात विश्वास नाही. कारण मी माणसं जगताना बघतोय.”