कोणताही अनुभव नसताना टेंडर न भरताच रोमेल रिटेलर्सला कोविड सेंटरला वैद्यकीय सामग्री पुरविण्याचे १०.९० कोटींचे कंत्राट

  • मुंबई महापालिकेचा “उद्योग”; भाजप आमदार अनंत सामंतांनी केला घोटाळ्याचा आरोप

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महापालिकेने गोरेगावच्या नेस्को एक्झिबिशन सेंटरवर उभारलेल्या कोविड केअर सेंटरला ऑक्सिजन सिलिंडर्स, मेडिकल बेड्स आणि अन्य सामग्री पुरविण्याचे कंत्राट रोमेल रिटेलर्स या बिल्डरला देण्यात आले आहे. या बिल्डरला ना या क्षेत्रातला काही पूर्वीचा अनुभव आहे, ना बिल्डरने यासाठी कुठले टेंडर भरले आहे. मुंबई मिररने ही बातमी दिली आहे.

२७ एप्रिलला त्यावेळचे महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी रोमेल रिटेलर्सला हे कंत्राट दिले. यात ऑक्सिजन सिलिंडर्स, मेडिकल बेड्स, फँन्स, मँट्रेस पुरविण्याचा कंत्राटात समावेश होता. रोमेल रिटेलर्स ही फर्म बांधकाम व्यवसायात आहे. वरील पैकी कोणतीही उपकरणे बनविणे किंवा पुरविणे याच्याशी त्यांचा काहीही संबंध नाही. कोणताही पूर्वानुभव नाही. अशा स्थितीत हे कंत्राट रोमेल रिटेलर्सला दिलेच कसे हा प्रश्न उपस्थित होत आहे.

महापालिकेच्या मँकनिकल अँड इलेक्ट्रीकल डिपार्टमेंटने २६ मे रोजी रोमेल रिटेलर्सला २ कोटी ६७ लाख आणि २ कोटी ७० लाख रुपयांच्या पे ऑर्डर्सही काढल्या. आतापर्यंतच्या उपकरणे पुरवठ्यासाठी ५ कोटी ६० लाखांची पे ऑर्डर काढण्यात आली आहे. पुढच्या तीन महिन्यांपर्यंत वरील उपकरणे पुरवठ्यासाठी नवी पे ऑर्डरही काढण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

२६०० बेड्स हे कोविड केअर सेंटर रोमेल रिटेलर्सच्या मदतीतून उभे राहिल्याचे सांगण्यात येते. तसा बोर्डच तेथे लागला आहे. फर्मच्या सीएसआर फंडातून १ कोटी रुपये दिल्याचे सांगण्यात येते. यातून एक्स रे मशीन्स, केबीन्स आणि लिक्विड सिलिंडर्स आणण्यात आली. एकूण कंत्राट १०.९० कोटी रुपयांचे आहे. परंतु, हे कंत्राट ८.४० कोटींचे असल्याचा फर्मचा दावा आहे.

परंतु, भाजपचे आमदार अनंत सामंत यांनी या कंत्राटावर तीव्र आक्षेप नोंदविला आहे. कोणतेही टेंडर न मागवता एका रात्रीत रोमेल रिटेलर्सला कंत्राट दिलेच कसे? हा घोटाळा केलाच कसा?, असा सवाल त्यांनी सध्याचे महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांना केला आहे. त्याच वेळी महापालिकेचे मँकनिकल अँड इलेक्ट्रीकल डिपार्टमेंटचे प्रमुख पी. वेलारसू यांनी या प्रकरणात आपल्याला काही माहिती नसल्याचे सांगत कानावर हात ठेवले आहेत. इक्बाल चहल यांनीही अधिक माहिती देण्यास नकार दिला.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*