कॉंग्रेसचे आपल्याच नेत्यांवर सूडचक्र, लेटरबॉंब टाकणाऱ्या नेत्यांना निवडणूक समितींमधून वगळले

उत्तर प्रदेशात कॉंग्रेसकडून आपल्याच नेत्यांवर सूडचक्र सुरू झाले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेमण्यात आलेल्या समित्यांमध्ये त्यांना स्थान देण्यात आलेले नाही. हे सूडचक्र आणखी किती पुढे जाणार अशी भीती आता या नेत्यांना वाटू लागली आहे.


वृत्तसंस्था

लखनऊ : उत्तर प्रदेशात कॉंग्रेसकडून आपल्याच नेत्यांवर सूडचक्र सुरू झाले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेमण्यात आलेल्या समित्यांमध्ये त्यांना स्थान देण्यात आलेले नाही. हे सूडचक्र आणखी किती पुढे जाणार अशी भीती आता या नेत्यांना वाटू लागली आहे.

कॉंग्रेसच्या २३ ज्येष्ठ नेत्यांनी पक्षामध्ये रचनात्मक बदल होण्याची मागणी केली होती. त्यावरून पक्षामध्ये वादंग निर्माण झाला होता. या नेत्यांवर राहुल ब्रिगेडकडून हल्ला करण्यात आला. त्याचबरोबर पक्षश्रेष्ठींकडूनही त्यांच्याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली होती.

आता यातीलच उत्तर प्रदेशातील नेत्यांना खड्यासारखे बाजुला ठेवण्यात आले आहे. विधानसभा निवडणूक प्रचार समित्यांंमध्ये त्यांना स्थान देण्यात आले नाही. उत्तर प्रदेशचे कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राज बब्बर, जितिन प्रसाद, आरपीएन सिंह यांना कोणत्याही समितीमध्ये स्थान दिलेले नाही.

या समित्यांमध्ये सलमान खुर्शीद, पीएल पुनिया, आराधना मिश्रा मोन, विवेक बंसल, सुप्रिया श्रीनेत, अमिताभ दुबे यांना स्थान देण्यात आले आहे. मात्र, यातील बहुतांश नेत्यांना उत्तर प्रदेशात जनाधार नाही. त्यामुळे केवळ पक्षश्रेष्ठींना पत्र लिहिले म्हणून जनाधार असलेल्या नेत्यांना बाजुला ठेवणे योग्य नाही, असे कॉंग्रेस कार्यकर्त्यांचेच म्हणणे आहे.

आज ज्या पध्दतीने कॉंग्रेस विखुरलेली आहे, त्यामुळे अनिश्चिततेचे वातावरण आहे. यामुळे आम्ही सर्वच जण चिंतीत आहोत. २०१४ च्या निवडणुकांत साडेदहा कोटी तर २०१९ च्या निवडणुकीत आठ कोटी नवीन मतदार आले. २००९ मध्ये कॉंग्रेसला ११.९२ कोटी तर भारतीय जनता पक्षाला ७.८४ कोटी मते मिळाले होती.

परंतु, २०१४ च्या निवडणुकीत कॉंग्रेसची मते १०.६० कोटी झाली. याचा अर्थ १.२३ कोटी मते कमी झाली. याच वेळी भारतीय जनता पक्षाची मते १७.६० कोटीवर गेली, असे सांगत या २३ नेत्यांनी पक्षाबाबत चिंता व्यक्त केली होती.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*