काँग्रेस नेते सत्तेच्या मस्तीत आले; कार्यकर्त्यांना दंग्यांचे सल्ले दिले


  • “कामे होत नसतील तर दंगा करा”मंत्री यशोमती ठाकूर यांचा कार्यकर्त्यांना सल्ला
  •  “शासकीय कार्यालयात जाताना सोबत चार-पाच जणांना घेऊन जाण्याचा सल्ला बाळासाहेब थोरातांचा सल्ला

विशेष प्रतिनिधी

सोलापूर : काँग्रेस नेते सहा – आठ महिन्यांतच सत्तेच्या मस्तीत आले आणि कार्यकर्त्यांना दंगा करण्याचे सल्ले देऊ लागले आहेत.

कामे होत नसतील तर दंगा करा, असा अजब सल्ला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिला आहे, तर शासकीय कार्यालयात जाताना सोबत चार-पाच जणांना घेऊन जाण्याचा सल्ला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. काल सोलापुरात झालेल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दोन्ही मंत्र्यांनी ही “मस्तीची सल्लागारी” केली आहे.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात तसेच महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर हे दोघेही शनिवारी सोलापुरात कोरोनाविषयक आढावा बैठकीसाठी आले होते. त्यापूर्वी त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक काँग्रेस कमिटीत घेतली. या कार्यकर्त्यांनी आपल्या समस्या मंत्र्यांसमोर मांडल्या. यामध्येच एका कार्यकर्त्यांने प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे तक्रारी घेऊन गेल्यानंतर कामे होत नसल्याचे सांगितले. यावर उत्तर देताना मंत्री यशोमती ठाकूर यांनी हे वक्तव्य केले आहे.

‘कामं होत नसतील तर दंगा करा. भीक मागितलं तर कोणी देत नाही, अधिकार हिसकावून घ्यावे लागतात. कोणत्याही तालुका अध्यक्षाने अशी तक्रार करु नये. तुम्हाला तालुका अध्यक्ष केले आहे, तुमचा तालुका तुम्ही सांभाळला पाहिजे. त्याला ताकद देण्याचं काम आम्ही करू’ असे वक्तव्य महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केलं. त्यानंतर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील असाच सल्ला कार्यकर्त्यांना दिला.

सोबत चार-पाच जणांना घेऊन जा

‘आम्ही इतके जिल्हे फिरलो, मात्र ही तक्रार पहिल्यांदा ऐकायला मिळाली, आपले लोक तिथल्या तिथे बंदोबस्त करतात. त्यामुळे आपलेच कुठतरी चुकतेय हे लक्षात घ्या. आपला धाक हा असला पाहिजे. धाक निर्माण करण्याची गरज जनतेची, कार्यकर्त्याची असली पाहिजे. चुकीचं वागणाऱ्या अधिकाऱ्यावर आपला धाक असला पाहिजे. आपण कार्यकर्ते म्हणून जाताना जरा एकजुटीने गेले पाहिजे, दोन-चार पोरं या बाजूला, दोन-चार पोरं दुसऱ्या बाजूला घेऊन गेले की सगळे व्यवस्थित चालते’ असा सल्ला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला.

या बैठकीनंतर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी कोरोना विषयक घडामोडींचा आढावा घेण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत थोरात आणि यशोमती ठाकूर यांना त्यांच्या वक्तव्याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, कामासाठी पैसे घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर नैतिक धाक असला पाहिजे. या अर्थाने आपण हे विधान केल्याचा खुलासा बाळासाहेब थोरात यांनी केला.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था