काँग्रेसमधील वादंग, शरद पवारांच्या एका डोळ्यात हसू तर दुसऱ्या डोळ्यात आसू !

कॉंग्रेस पक्षात निर्माण झालेल्या वादंगामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची स्थिती एका डोळ्यात हसू तर दुसऱ्यात आसू अशी झाली आहे. कॉंग्रेसचे नेतृत्व राहुल गांधी यांच्याकडे देऊ नये, अशी पवार यांची पहिल्यापासून इच्छा होती. त्यामुळे राहुल यांच्याविरुध्द सुरू झालेल्या बंडाळीमुळे त्यांना बरेच वाटत आहे. मात्र, काँग्रेसमधील या वादामुळे महाराष्ट्रातील सरकार पडेल काय अशी धास्तीही त्यांच्या मनात असल्याचे राजकीय सूत्रांनी सांगितले.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : कॉंग्रेस पक्षात निर्माण झालेल्या वादंगामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची स्थिती एका डोळ्यात हसू तर दुसऱ्यात आसू अशी झाली आहे. कॉंग्रेसचे नेतृत्व राहूल गांधी यांच्याकडे देऊ नये, अशी पवार यांची पहिल्यापासून इच्छा होती. त्यामुळे राहुल यांच्याविरुध्द सुरू झालेल्या बंडाळीमुळे त्यांना बरेच वाटत आहे. मात्र, कॉंग्रेसमधील या वादामुळे महाराष्ट्रातील सरकार पडेल काय अशी धास्तीही त्यांच्या मनात असल्याचे राजकीय सूत्रांनी सांगितले.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये कॉंग्रेस सहभागी आहे. काँग्रेस हा विरोधी पक्षांतील महत्त्वाचा दुवा असून तो दुर्बळ होऊ नये, अशी पवार यांची इच्छा आहे. मात्र, दुसऱ्या बाजुला कॉंग्रेस कमजोर झाली तर त्यांना हवेच आहे. त्यामुळे कॉंग्रेसमधील घडामोडींची ते सातत्याने माहिती ठेऊन आहेत.

काँग्रेसमध्ये संघटनात्मक खूप महत्त्वाचे बदल व्हायला हवेत, अशी मागणी करणारे एक पत्र त्या पक्षाच्या २३ महत्त्वाच्या नेत्यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना लिहिले होते. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकारिणीची सोमवारी बैठक झाली होती. त्यामध्ये सोनिया गांधी यांची पुन्हा अध्यक्षपदी निवड झाली.

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्षपद सांभाळण्यास पात्र नाहीत हे मत शरद पवार आधीपासून मांडत आले आहेत. काँग्रेसमध्ये तशा घडामोडी घडल्या तर पवारांचे मत खरे ठरेल, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांना वाटत आहे. काँग्रेस पक्षात फूट पडली होती, तशीच स्थिती पुन्हा उद्भवल्यास ती नामी संधी असेल असे राष्ट्रवादी काँग्रेसला वाटत आहे. मात्र, यामध्ये शरद पवारांसमोर एकच अडचण आहे ती म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे कथित बंडखोर कॉंग्रेस नेत्यांमध्ये सामील आहेत. त्यांचे आणि शरद पवारांचे विळ्या-भोपळ्याचे सख्य सर्वश्रुत आहे. त्यामुळे याचा फायदा शरद पवारांना मिळवून देण्यात ते विरोध करतील.

महाराष्ट्रात जनाधार असलेले नेते मात्र राहुल गांधी यांची पाठराखण करीत आहेत. त्यामुळे कॉंग्रेसमधील बंडखोरीला आणखी हवा देण्याचा प्रयत्न केला आणि तो उघड झाला तर महाराष्ट्रातील नेते राहुल गांधी यांच्याबरोबर जातील आणि महाविकास आघाडीचे सरकार धोक्यात येईल, अशी भीतीही राष्ट्रवादी कॉंग्रेसला वाटत आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*