राहुल चालले मोदींच्या वळणावर; काँग्रेसमधील सत्तरीपार नेत्यांना देणार सक्तीची निवृत्ती

कॉंग्रेसमधील बंडखोर ज्येष्ठांना त्यांची जागा दाखविण्यासाठी राहुल गांधी यांनी प्लॅन केला आहे. पक्षाच्या घटनेतच बदल करून सत्तर वर्षांवरील नेत्यांना निवृत्त करण्याचा प्रस्ताव मांडण्याची तयारी केली जात आहे. मात्र, त्यामुळे पक्षात उभी फूट पडण्याची शक्यता असून अहमद पटेल, अशोक गेहलोतांपासून ते कमलनाथांपर्यंत अनेक जण नाराज आहेत.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कॉंग्रेसमधील बंडखोर ज्येष्ठांना त्यांची जागा दाखविण्यासाठी राहुल गांधी यांनी प्लॅन केला आहे. पक्षाच्या घटनेतच बदल करून सत्तर वर्षांवरील नेत्यांना निवृत्त करण्याचा प्रस्ताव मांडण्याची तयारी केली जात आहे. मात्र, त्यामुळे पक्षात उभी फूट पडण्याची शक्यता असून अहमद पटेल, अशोक गेहलोतांपासून ते कमलनाथांपर्यंत अनेक जण नाराज आहेत.

कॉंग्रेसमधील २३ ज्येष्ठ नेत्यांनी हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षसंघटनेत बदल करण्यात सुचविले होते. मात्र, या पत्राचा खरा हेतू राहुल गांधी यांना पुन्हा अध्यक्षपदापासून रोखण्याचा होता. राहुल गांधी यांना अध्यक्षपदी नेमल्यास कॉंग्रेसला पुन्हा उभारी मिळणार नाही, असे त्यांनी सुचविले होते. यामुळे कॉंग्रेसमध्ये भूकंप झाला होता. त्यामुळेच सोनिया गांधी यांनाच पुन्हा अध्यक्षपदी नेमण्यात आले. मात्र, यामुळे पत्र लिहिणाऱ्या कॉंग्रेस नेत्यांवर राहुल गांधी चांगलेच भडकले आहेत. त्यांना धडा शिकविण्याबरोबरच पक्ष संघटनेत स्वत:ची माणसे मोक्याच्या जागी बसविण्याचे त्यांनी ठरविले आहे. यामुळे ७० वर्षांवरील नेत्यांनी निवृत्त व्हावे, असा प्रस्ताव ते मांडणार आहेत.

मात्र, यामुळे कपील सिब्बल, गुलाम नबी आझाद, भुपींदर हुड्डा यांच्यासारख्या बंडखोरांबरोबर सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय अहमद पटेल, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ, पी. चिदंबरम यांच्यासारख्या नेत्यांनाही आपली पदे गमवावी लागणार आहेत. त्यामुळे कॉंग्रेसमध्ये उभी फुट पडण्याची शक्यता आहे.

कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, राहुल गांधी यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या मर्जीतील लोक कॉंग्रेसमध्ये येतील पण पक्षच संपून जाईल. अनेक राज्यांत आता कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेतेच पक्षाला भवितव्य देऊ शकतात. त्यांनाच हटवून जनाधार नसलेल्या नेत्यांना जवळ केल्यास पक्ष संपून जाईल.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*