कवडीची किंमत नसलेल्या नातवाचे आणि त्याच्या आईचे आजोबांना ५० – ५० लाखांचे कर्ज

 • पवार घराण्यातील भांड्याला भांडे वाजल्याचा आवाज “परिपक्व” होऊन बाहेर आला
 • पवार घराण्यातील तिसऱ्या पिढीपेक्षा मधल्या पिढीतलाच सुप्त संघर्ष तीव्र
 • दोन सुनांमधील महत्त्वाकांक्षांचीही किनार

विशेष प्रतिनिधी

मुंबई : कवडीचीही किंमत नसलेला “अपरिपक्व” नातू पार्थ अजित पवार आणि त्याची आई सुनेत्रा अजित पवार या दोघांकडून आजोबा शरद पवारांनी प्रत्येकी ५० – ५० लाखांचे कर्ज घेतले आहे. ही बातमी कोणा शोध पत्रकाराच्या पत्रकारितेतून नाही, तर खुद्द शरद पवारांच्या affidavit मधून बाहेर आली आहे. निवडणूक आयोगाला सादर कराव्या लागणाऱ्या संपत्ती विवरणातून ही माहिती बाहेर आली आहे.

या खेरीज शरद पवारांनी जावई सदानंद सुळे यांच्याकडून २ कोटी रूपयांचे तर सुप्रिया इंटरप्रायझेसकडून ७५ हजार रूपयांचे कर्ज घेतल्याचे affidavit मध्ये दाखवली आहेत. इतरही कर्जे आहेत.

पवार घराण्यातील आजोबा विरूद्ध नातू हे मतभेद आता  “परिपक्व” होऊन बाहेर आले असले तरी यात पवारांच्या नातवांबरोबरच मुलगी – पुतण्या आणि दोन सुनांमधील राजकीय महत्त्वाकाक्षांचा सुप्त संघर्ष बाहेर पडल्याची अधिक चर्चा आहे.

महाराष्ट्रातल्या अन्य राजकीय घराण्यांमध्ये पडलेल्या फटी आणि फुटींमध्ये खुद्द शरद पवारांचा हात लपून राहिलेला नाही. अनेकदा पवारांवर तसे जाहीर आरोपही झाले. पण त्याच वेळी पवार स्वत:च्या राजकीय घराण्याचे एेक्य शाबूत ठेवत असल्याचीही चर्चा होती. परंतु, रोहित पवार की पार्थ पवार या वादातून पवार घराण्यातील “घरोघरी मातीच्या चुली” असा प्रकार समोर आला. पवार घराण्यातही भांड्याला भांडे लागून वाजल्याचे महाराष्ट्राने ऐकले.

सुप्रिया सुळे मुख्य वारसदार आणि रोहित पवार उपवारसदार हे शरद पवारांनी मनात ठरवले असले तरी जाहीररित्या सांगितलेले नाही. अजित पवारांना पुढे आणताना रोहित पवारांच्या वडिलांची राजेंद्र पवारांची राजकीय महत्त्वाकांक्षा शरद पवारांनी मारली होती. रोहित पवारांना पुढे आणावे लागण्याचे कारण त्या नजीकच्या भूतकाळात आहे. यात स्वत: रोहित पवार आणि त्यांची आई सुनंदा पवार यांची आग्रही भूमिका कारणीभूत असल्याची चर्चा आहे. मात्र या प्रकारात पार्थची आई सुनेत्रा पवार मागे राहायला तयार नाहीत. त्यांच्या अतिआग्रहापोटी पार्थला लोकसभेची उमेदवारी द्यावी लागली. पवार घराण्यातला निवडणुकीतला पहिला पराभव झाला.

त्यानंतर पहाटेच्या शपथविधीतून दोन पवारांमध्ये मतभेद झाले. कुटुंब फुटल्याचे ट्विट सुप्रिया सुळे यांनी केले होते. यानंतर काही महिने “शांततेत” गेले. मग पार्थ पवारांनी उचल खाल्ली. त्यांनी सुशांत, राम मंदिराबाबत शरद पवारांच्या जाहीर भूमिकांपेक्षा वेगळी भूमिका घेतली. या वरून भाजपच्या गोटातून पार्थचे कौतुक सुरू आहे. भाजपचे नेते पार्थच्या कौतुकाचे टि्वट करत आजोबा – नातवाच्या या आगीत तेल ओतण्याचे काम करताहेत. पण हा आरोप करणारे मूळात “आग लागल्याचे” मान्य करत आहेत.

शरद पवार विरूद्ध अजित पवार

 • लोकसभा निवडणुकीच्या वेळी शरद पवार यांच्या ईडी चौकशी प्रकरणावेळी अजित पवारांनी अचानक राजीनामा दिला होता. पवार कुटुंबातील कलहामुळेच हा राजीनामा दिल्याचे चित्र त्या वेळी रंगवण्यात आले. नंतर शरद पवारांना याबाबत स्पष्टीकरण द्यावे लागले होते. येथूनच अजित आणि शरद पवार यांच्यात अलीकडील असंतोषाची ठिणगी पडली होती.
 • सुनेत्रा पवारांच्या अतिआग्रहापोटी पार्थ पवार यांना लोकसभेला तिकीट देण्यात आले. नंतर त्यांचा पराभव झाला. त्याचाही राग अजित पवार यांच्या मनात आहे.
 • विधानसभा निवडणुकीनंतर पहाटेच्या सरकारमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. नंतर हा गोंधळ मिटवताना शरद पवार यांना जो त्रास झाला त्यातूनही अजित आणि शरद पवार यांच्यातील दरी वाढली.
 • शिवसेनेचे पारनेरमधील नगरसेवक फोडाफोडी प्रकरणात पार्थ पवार आणि अजित पवारांच्या भूमिकेवरही शरद पवार नाराज असल्याचे म्हटले जाते.

सुप्रिया सुळे विरूद्ध अजित पवार

शरद पवार यांचा राजकीय वारसदार कोण, यावरूनही संघर्ष असल्याचे मानले जाते. कन्या सुप्रिया सुळे याच शरद पवारांच्या खऱ्या वारसदार असे मानणारा मोठा वर्ग राष्ट्रवादीत आहे. तर पुतण्या अजित पवार हेच राजकीय वारसदार मानणारा एक वर्ग आहे. मात्र सुप्रिया आणि अजितदादांनी याचा वारंवार इन्कार केला आहे.

रोहित विरूद्ध पार्थ

पवार कुटुंबातील तिसरी पिढी राजकीय मैदानात उतरल्यानंतर वारसा पुढे कोण नेणार यावरून चर्चा रंगू लागल्या. अजितदादांचे पुत्र पार्थ यांचा लोकसभेत पद्धतशीरपणे पराभव करण्यात आला, असे मानणारा एक गट आहे. रोहित यांना विधानसभेत निवडून आणण्यासाठी खास ताकद लावण्यात आल्याचे मानणारा दुसरा गट आहे.

सुनंदा पवार विरूद्ध सुनेत्रा पवार

शरद पवारांचे राजकीय वारसदार नातू रोहित हेच आहेत असे रोहितच्या मातोश्री सुनंदा पवार यांना वाटते, तर पार्थने पवार घराण्याचा वारसा चालवावा असे त्यांच्या आई सुनेत्रा अजित पवार यांना वाटते, त्यावरून या दोघींत सुप्त संघर्ष असल्याचीही जोरदार चर्चा आहे.

राष्ट्रवादीतील गटबाजी

राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही गटबाजी असल्याचे वेळोवेळी दिसले आहे. अजित पवारनिष्ठ आणि शरद पवारांचे निष्ठावान असे गट असल्याचे आजवरच्या घटनांवरून दिसले आहे.

राष्ट्रवादीत सध्या जयंत पाटील यांची चलती आहे. विधानसभा निवडणुकीत जयंतराव सातत्याने शरद पवार यांच्या सोबत होते. जयंतराव आता राष्ट्रवादीत प्रभावी झाले असून त्यांना मानणारे काही आमदार, कार्यकर्ते पक्षात असल्याचे मानले जाते.

पहाटेच्या सरकारचा अनुभव घेऊन आघाडी सरकारमध्ये पुन्हा उपमुख्यमंत्रिपद मिळ‌वणाऱ्या अजितदादांचे पक्षात मोठे वजन आहे.

उपमुख्यमंत्रिपदासह अर्थसारखे अत्यंत महत्त्वाचे खाते अजितदादांचे पक्षातील वर्चस्व सांगते. अलीकडेच विधान परिषद निवडणुकीत अमोल मिटकरी यांना आमदार करण्यात अजितदादांचा मोठा वाटा होता.

आदित्य ठाकरे ‘फॅक्टर’

आघाडीच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य यांना मंत्रिपद मिळाले. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थला काहीच मिळाले नाही, एकीकडे आदित्य यांचे वाढते वजन आणि दुसरीकडे पार्थकडे राष्ट्रवादीकडूनच होणारे दुर्लक्ष, टीका यामुळे अजितदादांच्या गटात अस्वस्थता असल्याची चर्चा आहे.

  Leave Your Comment

  Your email address will not be published.*