मुंबई पाकिस्तानव्याप्त काश्मीरसारखी झाली असे म्हणून कंगना राणावतने वासरू मारले. पण स्वत:ला बुद्धीवादी समजणार्या शिवसेनेचे खासदार आणि संपादक संजय राऊत यांनी तर आता गायच मारली आहे. अहमदाबाद ‘मिनी पाकिस्तान’ असल्याचे तारे त्यांनी तोडले आहेत.
विशेष प्रतिनिधी
अहमदाबाद : मुंबई पाकिस्तानव्याप्त काश्मीरसारखी झाली असे म्हणून कंगना राणावतने वासरू मारले. पण स्वत:ला बुद्धीवादी समजणार्या शिवसेनेचे खासदार आणि संपादक संजय राऊत यांनी तर आता गायच मारली आहे. अहमदाबाद ‘मिनी पाकिस्तान’ असल्याचे तारे त्यांनी तोडले आहेत.
“राऊत यांनी गुजराती जनतेची माफी मागावी,” अशी मागणी गुजरातचे भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते भरत पंड्या यांनी केली आहे. बॉलिवूड अभिनेत्री कंगनाने मुंबईची तुलना पाकिस्तानव्याप्त काश्मीरशी केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना संजय राऊत यांचा तोल गेला.
कंगनावर टीका करताना राऊत म्हणाले होते, कंगनात हिंमत असेल तर तिनं अहमदाबादची तुलना ‘मिनी पाकिस्तान’शी करून दाखवावी. जर त्या मुलीनं मुंबई आणि महाराष्ट्राला मिनी पाकिस्तान म्हणण्यासाठी माफी मागितली तर मी याबद्दल विचार करेन. तिच्यात एवढी हिंमत असेल तर ती अहमदाबादबद्दल हेच म्हणू शकेल का?
संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर गुजरात भाजपचे प्रवक्ते भरत पंड्या यांनी ‘शिवसेना नेत्यांनी अहमदाबादला छोटा पाकिस्तान म्हणत गुजरातचा अपमान केलाय. यासाठी त्यांनी गुजरात, अहमदाबाद आणि अहमदाबादवासियांची माफी मागावी’ असं म्हटलंय. ‘शिवसेनेनं गुजरात, गुजराती रहिवासी आणि नेत्यांना मत्सर, घृणा आणि द्वेषाच्या भावनेतून निशाण्यावर घेणं बंद करावं’ असंही पंड्या यांनी म्हटलंय.
गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत आणि कंगना यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलंय. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाबद्दल बोलतानाच कंगना रानौत हिनं मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती.