आभाळ कोसळत नाहीये; सोनियांना पत्र लिहिणाऱ्या नेत्यांना सलमान खुर्शीदांचा टोला

  • सोनिया गांधी, राहुल गांधी हे नेतेच आहेत

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : काँग्रेसमधील अध्यक्ष निवडीचा प्रश्नावर कार्यकारिणीच्या बैठकीत अध्यक्ष निवडीच्या प्रश्नावर तोडगा काढण्यात आला असला तरी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रावरून काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचे चित्र आहे. पत्र लिहिलेल्या नेत्यांबद्दल विरोधी सूर लावला जाताना दिसत असून, पत्र लिहिलेले नेते आपली बाजू मांडतांना दिसत आहेत. “अध्यक्ष निवडीची कसलीही घाई नाही, आभाळ कोसळत नाहीये,” असे काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी पत्र लिहिणाऱ्या नेत्यांना सुनावले आहे.

युपीए सरकारच्या काळातील मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी सोनिया गांधी यांना पाठवण्यात आलेल्या पत्रावरून जो वादंग झाला त्यावर पीटीआयशी बोलताना भूमिका मांडली आहे. “पत्र लिहिणारे नेते पक्ष नेतृत्वाच्या जवळच्या आहेत, हे अगदी स्पष्ट आहे. त्यामुळेच सोनिया गांधी यांनी असे सूचित केले की या नेत्यांनी पक्षाच्या मर्यादेत राहून या विषयावर चर्चा करायला हवी होती,” असे खुर्शीद म्हणाले.

२३ नेत्यांनी पत्रात उपस्थित केलेल्या काँग्रेस अध्यक्ष निवडीच्या मुद्यावर बोलताना सलमान खुर्शीद म्हणाले, “माझ्यासारख्या लोकांसाठी अगोदरपासूनच सोनिया गांधी आमच्या नेत्या आहेत. राहुल गांधी आमचे नेते आहेत. त्यामुळे माझ्या मते पक्षाध्यक्ष निवडण्याची घाई करण्यात कसलाही तर्क नाही. पक्षाध्यक्षांची निवड जेव्हा करता येईल तेव्हा होईल. त्यामुळे आभाळ कोसळतेय असे मला दिसत नाहीये. पक्षाध्यक्ष निवडीची घाई कशासाठी केली जातेय, हे मला अजूनही कळत नाहीये.,”

लोकसभा निवडणुकीपासून काँग्रेस पक्षाला मरगळ आल्याचे नमूद करत पक्षातील २३ नेत्यांनी सोनिया गांधी यांच्याकडे पक्षाध्यक्षांची निवड करण्याची मागणी केली होती. या नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं होतं. त्यात काँग्रेसच्या पुर्नबांधणीचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला होता. या पत्रानंतर काँग्रेसची बैठक झाली. त्यात यावर तोडगा काढण्यात आला. मात्र, त्यानंतर पत्रावरून काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचे चित्र दिसून येत आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*