मुंबईत जे घडतंय ते आहे फार भयानक…


आमदार नितेश राणे यांनी मृतदेहांच्या शेजारीच कोविड रूग्णांवर उपचार करीत असल्याचा व्हीडीओ शेअर केला आहे. त्यांच्या त्या व्हीडीओत सत्य आहे, हे सांगण्यासाठी कोणत्याही तज्ञाची गरज नाही. ही आजची आपल्या सरकारी हॉस्पिटलची खरी अवस्था आहे. हे मान्य करावेच लागेल. मुंबईत जे घडतंय ते फार भयानक आहे आणि हे कोरोनाशी खर्‍या अर्थाने सामना करणार्‍या योद्धांचा अपमान करणारे आणि त्यांचे मॉरल खच्ची करणारे आहे…


राजा आदाटे, पत्रकार (मुंबई)

मुंबईतील रूग्णालयातील डेडबॉड्यांचा ढीग आता वाढू लागलाय. ही आजची खरी परिस्थिती आहे. अनेक डॉक्टर्स, नर्स, बार्ड बॉय, अ‍ॅम्ब्यूलन्सचे चालक आणि सफाई कर्मचारी आपल्या जीवाची बाजी लावून कोरोना संकटाचा सामना करत आहेत. ही वस्तूस्थिती नाकारता येणार नाही. त्यांना मनापासून सलाम करावासा वाटतो. मात्र या लढ्यातही अनेक असे सरकारी डॉक्टर्स आढळून येत आहेत की जे रूग्णांना तपासायला आणि रूग्णालयात दाखल करून घ्यायला नकार देत आहेत किंवा गरज नसताना रूग्णांना मृत्यूच्या जबड्यात लोटत आहेत. त्यांच्या या वागण्यांमुळे जीव धोक्यात घालून आहोरात्र झटणार्‍या आरोग्य दुतांची बदनामी होत आहे. हे सत्य आहे.

मुळ घटना अशी आहे. की माझा एक गेल्या 35 वर्षांपासूनचा जवळचा मित्र संतोष कांबळे (नाव बदलेले आहे) जो सरकारी सेवेत नोकरीला आहे. त्याला 1 मे रोजी रात्री हृदयविकाराचा झटका आला. त्याची सुविद्य पत्नी आणि एकूलता एक मुलगा जो दहावीचा विद्यार्थी आहे, ते या प्रकाराने गोंधळून गेले. मग सुरू झाला त्याच्या उपचाराचा प्रवास. त्याची पत्नी रातोरात त्याला घेवून मिळेल त्या वाहनाने मुंबईतील सर्व हॉस्पिटलचे दरवाजे ठोठावू लागली. सायन हॉस्पिटल, गुरू गोविंद सिंग हॉस्पिटल, होली स्पिरीट हॉस्पिटल अशा अनेक हॉस्पिटलमध्ये तीने आपल्या नवर्‍याराला घेवून रात्रभर विनवन्या केल्या. सर्वांनी दाखल करून घ्यायला नकार दिला. एका हॉस्पिटलने तात्पुरत्या गोळ्या देवून कोणत्या तरी हॉस्पिटलमध्ये तातडीने भरती करा, घरी घेवून जावू नका, त्याला मायनर अ‍ॅटॅक येवून गेलाय, असा सल्ला दिला. या चक्रात रात्र संपली होती आणि एव्हाना सकाळ झाली होती.

अखेर तीने माझा मित्र दिपक नावाच्या पत्रकाराला सकाळी सकाळी फोन केला. त्याला सुबुध्दी सुचली आणि त्याने मला फोन केला. आदल्या दिवशीच माझे वडिलांसमान चुलत बंधु वारले होते. तरीही मी लगेचच वहिनींना फोन करून जे जे हॉस्पिटलमध्ये त्याला घेवून जा मी बोलणेे करतो, असा सल्ला देत त्यांना धीर दिला. त्यानंतर आमची परिक्षा सुरू झाली. मी दिपक कैतके या माझ्या दुसर्‍या पत्रकार मित्राला फोन करून कल्पना दिली आणि स्वतः उच्चपदस्थ डॉक्टरांना संपर्क करण्यास सुरूवात केली. त्यांनी पहिला प्रश्‍न केला की त्याची कोरोना टेस्ट झाली आहे का? त्यानंतर त्यांनी सल्ला दिला की, कार्डीयाक डिपार्टमेंटला बेड खाली आहेत की नाहीत हे पहावे लागेल, तोपर्यंत केईएम मध्ये काही होतंय का बघ. मी सायन रूग्णालयात आणि केईएमला जवळच्या लोकांना विनंती करण्याचा प्रयत्न केला. परंतू सर्वांनी नकार दिला. मात्र तोपर्यंत हा संभावीत धोका ओळखून मी त्यांना रेटून सांगितले होते की, त्याची पत्नी त्याला घेवून जेजेला पोहचत आहे, काय करू?. त्यांनी सांगितले त्याला कॅज्युलीटीला घेवून जायला सांग. मात्र तोवर दिपकने जेजेत संपर्क करून त्याला अ‍ॅडमीट करण्याची व्यवस्था करून ठेवली होती. पेशन्ट अखेरीला जेजेत पोहचला.

मात्र खरी परीक्षा तर त्यानंतरच सुरू झाली. जेजेतील डॉक्टरांनी त्याला फिवर दाखवत आहे असे सांगून त्याची कोरोना टेस्ट करण्यासाठी त्याला सेन्ट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये पिटाळंले. त्यानंतर त्याच्या पत्नीने तीच्या भावाला त्याच्या सोबतीला ठेवत सेन्ट जॉर्जमध्ये दाखल केले. तारीख होती 2 मे. दिपकनेही सेन्ट जॉर्जमध्ये यंत्रणा हालवत त्याची कोरोना चाचणी करण्यासाठी लगबग करण्याचा प्रयत्न केला. संध्याकाळी मला त्याचा फोन आला तो धक्कादायक होता. राजा मला काय म्हणायचंय ते ऐकून घे. मी सरकारी कर्मचारी आहे पळून जाणार नाही, परंतू मी हार्टचा पेशन्ट आहे आणि मला जीथे अ‍ॅडमीट केलंय तीथे माझ्या डोक्याजवळची कॉट आणि अजूबाजूच्या कॉट धरून किमान पाच सहा डेड बॉड्या पडल्या आहेत. त्या कालपासून आहेत आणि त्यांना कोणीही हात लावायला तयार नाहीत. माझा रिपोर्ट येईल तेव्हा येईल, परंतू मला येथून दुसर्‍या ठिकाणी हलवा. त्याचं गांभिर्य लक्षात घेवून मग 2 तारखेला आमचा प्रयत्न सुरू झाला आणि त्याला तीन तारखेला दुसर्‍या वॉर्डमध्ये सीफ्ट करण्यात आले. तो जीवाला घाबरून मला आणि दिपकला सातत्याने फोन करण्याच प्रयत्न करत होता. कारण तीन तारखेला त्या दुसर्‍या वार्डमध्येही आणखी डेडबॉड्या येवून पडल्या. दिपकच्या घरात फोनच्या रेंजचा प्रॉब्लेम आणि त्यात त्याच्या हजार अडचणी. पेशन्ट मला सांगण्याचा प्रयत्न करत होता की, अरे राजा मी आलोय हार्टच्या प्रॉब्लेमसाठी आणि नसलेला कोरोना होवून मरतोय की काय? असा प्रश्‍न मला पडलाय, असे तो म्हणत होता. अशा स्थितीतही मी त्याला धीर देत हसवण्याचा प्रयत्न करत होतो. तोही तशा परिस्थितीत हसला आणि मला म्हणाला लेका तब्बल 48 तासानंतर पहिल्यांदा तुझ्यामुळे हसतोय.

असे करता करता चार तारीख उजाडली होती. मात्र आता माझाही धीर आता सुटत चालला होता. कारण त्याचा रिपोर्ट काही येत नव्हता. एव्हाना दिपकच्या डोक्यालाही घाम फुटायला लागलाय हे मला जाणवत होते. अखेर त्याचा रिपोर्ट आलाय आणि तो क्‍लीअर नाही, त्याचे पुन्हा ब्लड सॅम्पल घेतील, असा दिपकचा पहिला मेसेज मला आला आणि माझी कंबर बसण्याची वेळ आली. आता त्याला कसे समजवावे हा मोठ्ठा प्रश्‍न माझ्यासमोर होता. मला काही सुचेना म्हणून मी त्याचा फोन घेणं थोडावेळ टाळू लागलो. मात्र त्यानंतर त्याचा कोवीड19 निगेटीव्ह असा पीडीएफ रिपोर्ट दिपकने मला वॉटसअप केला. मी सुटकेचा निश्‍वःस टाकला. उद्या सकाळी डिसचार्ज करतील, असे म्हटल्यावर मला ही बरे वाटले. सकाळी सकाळी दिपकनेही वरिष्ठांना मेसेज करून कळवले, त्यांनीही तात्काळ डिस्चार्ज देवू म्हणून सांगितले. ते स्वतः त्याच्याकडे (पेशन्टकडे)जावून तुम्हाला आता डिस्चार्ज मिळेल असे सांगून गेले. त्यामुळे तोही जीवात जीव येवून खूष झालेला. त्यानंतर 11 वाजले, 12 वाजले, 1 वाजला, दोन वाजले, अखेर तीन वाजता मी त्याला फोन केला तेव्हा तो जीवाच्या आकांतांने ओरडत होता. अरे आता तरी मला येथून बाहेर काढा. शेवटी दिपकने फोनाफोनी करून संध्याकाळी त्याची सुटका केली. तो प्रामाणिक पेशन्ट सारखा पुन्हा रिपोर्ट घेवून जेजेला गेला. तीथे डॉक्टर फोन उचलत नव्हते. एसएमएसला रिप्लाय देत नव्हते. अखेर तो थेट चौथ्या मजल्यावर पोहचला तर त्याचा चार दिवसात झालेला भिकार्‍यापेक्षाही खराब अवतार बघून नर्सने सांगितले डॉक्टर गावी गेले आहेत. तो शांतपणे घरी गेला. कपड्यांपासून सर्व वस्तू सॅनेटाईझ केल्या, कडक कडक पाण्याने अंघोळ केली, सोबतच्या मेव्हूण्याचीही अवस्था त्याच्यासारखीच झालेली. त्यानंतर त्याला मी त्याला फोन केला तेव्हा मला काय काय सांगू असे त्याला झालेले. मरणाच्या दारातून परत आल्यासारखे त्याला झाले होते. आता काल सहा तारखेला त्याची जेजेत टुडी इको आणि इतर टेस्ट करून त्याला गोळ्या आौषधांवर काही दिवस दम धरण्याचा सल्ला मिळालाय.

आमदार नितेश राणे यांनी असाच एका प्रकरणाचा बोलका व्हिडीओ व्हायरल केलाय. आमदार राणे यांच्या प्रत्येक वाक्यांचे मी समर्थन करत नाही, मात्र त्यांच्या त्या व्हीडीओत सत्य आहे, हे सांगण्यासाठी कोणत्याही तज्ञाची गरज नाही. ही आजची आपल्या सरकारी हॉस्पिटलची खरी अवस्था आहे. हे मान्य कारवेच लागेल. तरच पुढचा सामना यशश्‍वी होवू शकतो.

याच दरम्यान मी या प्रकरणाचा मागोवा घेतला. तर काही गोष्टी माझ्या ध्यानात आल्या त्या अशा.

  1. मुंबईतील सर्व हॉस्पिटलांचे शवागारातील शीतगृहे मिळून साधारणतः फक्त दीडशे ते दोनशे मृतदेह ठेवण्याची क्षमता आहे.
  2. अनेक बेवारस मृतदेह अनेक कारणांमुळे अजूनही त्यामध्ये आधीच पडलेले आहेत. त्यांचे डिस्पोजल झालेले नाही.
  3. कोरोनाचा रिपोर्ट यायला दोन ते तीन दिवस लागत आहेत. तोपर्यंत डेडबॉडी डिस्पोज करता येत नाही किंवा नातेवाईकांच्या ताब्यात देता येत नाही. त्यामुळे ढिगारा वाढतो आहे, ही वस्तूस्थिती आहे.
  4. अनेक मृतदेह ताब्यात घ्यायला नातेवाईक पुढे येत नाहीत किंवा लवकर येत नाहीत हेही एक कारण आहे.
  5. सर्वच हॉस्पिटलमध्ये अपुरा कर्मचारी वर्ग आहे. त्यामुळे त्यांचे लक्ष आलेल्या पेशन्टला वाचवण्याकडे असते, असा डॉक्टरांचा दावा आहे. तसे डब्लूएचओचे नियमही आहेत.
  6. मात्र हे सारे करताना कोणते पेशन्ट कोणत्या वॉर्डमध्ये ठेवले जात आहेत, याचे तारतम्य का बाळगले जात नाही किंवा आलेला रूग्ण तपासलाच पाहिजे हा सरकारचा नियम का पाळला जात नाही? याचे उत्तर कोणत्याही डॉक्टरांकडे नाही.
  7. ओपीडी बंद आहेत त्यामुळे जेजे पासून अनेक हॉस्पिटलचे वॉर्ड अक्षरशः रिकामे असूनही बेड उपलब्ध नाहीत, असे उत्तर का दिले जात आहे? याचे उत्तर कोणाकडे नाही.
  8. ही वस्तूस्थिती कोणत्याही मंत्र्यांनी अथवा मुंबईसाठी नेमलेल्या 9 पैकी कोणत्याही एका आयएएस अधिकार्‍याने अचानक धाड टाकून तपासावी, खरे पितळ उघड होईल.
  9. आज मितीला कोणत्या हॉस्पिटलमध्ये कोणत्या वॉडमध्ये किती रूग्ण दाखल आहेत हे गेटवर डिजीटल बोर्ड लावून डिल्प्ले करावे, अशी काहीतरी यंत्रणा निर्माण करावी, असे मला वाटते.

असो एकंदरीत आमचा पेशन्ट जिवंत परत आला याचे मला समाधान आहे. त्याचे धैर्य त्याला इथपर्यंत घेवून आले. वानगीदाखल घडलेला हा प्रकार सगळ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे. हाच प्रकार चक्क एका पोलिस अधिकर्‍याच्या बाबतीतही घडत होता. मात्र थोडी दमदाटी केल्यानंतर त्याला अ‍ॅडमिट करून घेण्यात आले आहे. पण जे घडतंय ते फार भयानक आहे आणि हे कोरोनाशी खर्‍या अर्थाने सामना करणार्‍या योध्यांचा अपमान करणारे आणि त्यांचे मॉरल खच्ची करणारे आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अथवा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या प्रयत्नांबद्दल माझ्या मनात आजिबात शंका नाही. मात्र खाली घडतंय ते हे सत्य आहे….

कोणाचेही मन दुखावण्याचा माझा हेतू नाही, परंतू बोलणे गरजेचे वाटले म्हणून हा प्रपंच…

(सौजन्य – फेसबुक पोस्ट)

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात