उद्धव ठाकरे यांना निर्णय फिरवायला लावला; पवारांच्या हस्तक्षेपानंतर लॉकडाऊन शिथिल


  • कोरोनाचा आकडा हाताबाहेर गेल्यास जबाबदार कोण? यावर चर्चा नाही
  • महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत जनजीवन पूर्वपदावर आणण्याबाबत चर्चा

विशेष प्रतिनिधी

मुंबई : कोरोना लॉकडाऊनच्या चौथ्या पर्वात महाराष्ट्रात निर्बंध कायम ठेवण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले खरे पण राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये याची तीव्र प्रतिक्रिया उमटली. राज्यातील जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी काही अटी शिथिल कराव्याच लागतील, अशी भूमिका शरद पवार यांनी मांडल्यावर उद्धव ठाकरे यांना माघार घ्यावी लागली आणि काही अटी शिथिल कराव्या लागल्या.

मात्र, रेडझोनसह इतरत्र कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतो आहे. त्याला प्रतिबंध कसा करावा? हा आकडा हाताबाहेर गेल्यास जबाबदारी कोणाची यावर पवारांसह महाविकास आघाडीतील कोणीही चकार शब्द बोलायला तयार नाही.

दिल्ली, पंजाब, केरळ, कर्नाटक, तेलंगण आदी राज्यांनी लॉकडाऊन शिथिल केले. त्याच वेळी महाराष्ट्राच्या रेड झोनमधील निर्बंध कायम ठेवण्यात येतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइवद्वारे सोमवारी रात्री स्पष्ट केले होते.

याआधी लॉकडाऊन वाढवताना रेड झोन वगळता अन्यत्र राज्यातील जनजीवन पूर्वपदावर येईल अशा पद्धतीने नियोजन करावे, अशी सूचना शरद पवार यांनी गेल्या आठवडय़ात मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत केली होती. परंतु, ठाकरे यांनी सावध भूमिका घेतल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नापसंती व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक बोलाविली होती. शरद पवार यांच्यासह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, उपमुख्यमंत्री अजित पवार आदी या वेळी उपस्थित होते.

लॉकडाऊनच्या काही अटी शिथिल करून राज्यातील परिस्थिती पूर्वपदावर आणावी. यासाठी दररोज ठरावीक वेळ निश्चित करावी, अशी सूचना शरद पवार यांनी बैठकीत केली. उद्योग सुरू करण्यावर सरकारचा भर असला तरी सध्या दिलेल्या सवलती पुरेशा नाहीत याकडे पवारांनी लक्ष वेधले. आधीच्या तीन पर्वाच्या तुलनेत चौथ्या टप्प्यात काही तरी सवलती आवश्यक असल्याची भूमिका बाळासाहेब थोरात यांनी मांडली. महाविकास आघाडीतील मित्रपक्षांची भूमिका लक्षात घेता, रेड झोन वगळता अन्यत्र शिथिलता आणण्यावर एकमत झाले. यानुसार राज्य सरकारने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली.

वास्तविक उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव करण्यापूर्वी काही तास आधी या विषयावर पवार व थोरातांना त्यांच्याशी चर्चा करता आली असती पण ती टाळून त्यांनी उद्धव ठाकरे यांचे फेसबुक लाइव होऊ दिले आणि नंतर सूचना करून त्यांना निर्णय फिरवायला लावला.

पवारांच्या सूचना

  • शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास विलंब लागणार असल्याने विद्यार्थी, शिक्षक आणि शैक्षणिक संस्था यांचे नुकसान टाळण्यासाठी तज्ज्ञांचा अभ्यास गट स्थापन करावा.
  • मजूर मोठय़ा प्रमाणावर स्थलांतरित झाल्याने उद्योगांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. मजूरांना परत आणण्यासाठी नियोजन करावे.
  • राज्यातील तरुण पिढीला व मराठी तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्यांच्यासाठी कृती कार्यक्रम तयार करावा. उद्योग आकर्षित करण्यासाठी प्रोत्साहनपर धोरण तयार करावे.
  • रस्ते वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न व्हावेत. रेल्वे आणि विमानसेवा पूर्ववत करण्याकरिता कालबद्ध कार्यक्रम तयार करावा.
  • कोरोना लगेचच हद्दपार होण्याची शक्यता नाही. त्यासाठी जनतेत व्यापक जनजागृती करावी.

“राज्यातील जनजीवन पूर्वपदावर यावे ही शरद पवार यांची सुरुवातीपासूनच भूमिका होती. त्यातूनच त्यांनी गेल्या आठवडय़ात व आज पुन्हा मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन काही सूचना केल्या.”

नवाब मलिक, अल्पसंख्याक विकासमंत्री व प्रवक्ता, राष्ट्रवादी

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात