पाच दिवसांचा संघर्ष, ३०,००० घनमिटर वाळूचा उपसा, असे बाहेर काढले सुएझ कालव्यात अडकलेले अवाढव्य जहाज

वृत्तसंस्था

कैरो : सुएझ कालव्यात अडकलेले एव्हर ग्रीन हे अवाढव्य जहाज अखेर तरंगू लागले आणि साऱ्या जगाने सुटकेचा निश्वास टाकला. कालव्यातील कोंडी फोडण्यासाठी कसे प्रयत्न झाले त्यावर जगभरातील माध्यमांत चर्चा झाली. त्याची माहिती घेणे फार रंजक आहे. How giant ship freed in Suez cannel

आशियातून जहाजांना युरोपात जायला सुएझ कालव्यातून जावे लागते. सुएझ कालवा हा लाल समुद्र ते भुमध्य समुद्राला जोडणारा मानवनिर्मित दुवा आहे. दररोज या कालव्यातून साधारण ९.६ बिलियन डॉलर्सच्या मालाची वाहतूक होत असते. हा कालवा नाही, तर भुमध्य समुद्रात माल पोहोचवायचा तर आफ्रिकेला वळसा घालावा लागेल, ज्यामुळे मालाला पोहोचायला ८-१० दिवसांची भर पडेल. असा हा इजिप्तची जगाला भेट असलेला १९३ किमी लांबीचा कालवा साधारण १५० वर्षांपूर्वी निर्माण केलेला आहे. या जहाजाने १९३ पैकी जवळपास १५१ किमी चा भाग ओलांडला होता.एव्हर ग्रीन जगातल्या सर्वांत मोठ्या कंटेनर जहाजांपैकी एक. २०००० कंटेनर वाहून नेण्याची क्षमता असलेले हे जहाज जवळपास ४०० मीटर लांब तर ६० मीटर रूंद आहे. आणि त्याचे एकूण वजन २,००,००० टनांइतके आहे. हा काळ सहारा वाळवंटातून मोठ्या प्रमाणात वाळूचे वादळं येण्याचा आहे. वाऱ्याचा वेग अधिक असल्यामुळे जहाज जहाज कालव्याच्या उत्तरेकडील तटाच्या रेतीत रुतले. जहाज अडकले आणि व्यापारी जगताची हवा तंग झाली.

ज्या ठिकाणी तासाभराच्या विलंबाकरिता मोठा दंड भरावा लागतो, तिथे प्रयत्न करूनही जहाज हलेनांत म्हणून ताबडतोब इजिप्तच्या सॅल्वेज टग्ज (‘टग’ हि एक ताकदवान इंजीन असलेली, जी ओढ-ढकल करण्याकरिता वापरली जाणारी एक बोट असते) आल्या व त्यांनी जहाजाला मोकळं करायची सुरूवात केली. दोन दिवस रात्रंदिवस प्रयत्न करून जहाज तसूभरही हलले नाही तेव्हा नामांकित डच सॅल्वेज कंपनी ‘स्मिट सॅल्वेज बि.व्ही.’ ला प्राचारण करण्यात आले व साधारण दहा टग्ज जहाजाच्या चहुबाजूंनी अतिशय कौशल्याने ओढत वा धक्का देऊ लागल्या.

जहाजाच्या बलबसबोव्ह (जे पुढचं टोक) खालची वाळू किनाऱ्यावर टाकली जाऊ लागली. यात साधारणपणे ३०,००० घनमिटर वाळूचा उपसा केला गेला. जहाजावरील अतिरिक्त पाणीसाठा बाहेर ओतला जाऊ लागला. जहाज हलकं केलं जाऊ लागलं. परवाची पौर्णिमा भरती घेऊन येणार होती. भरतीने पाण्याचा स्तर वाढणार होता. आणि तब्बल ५ दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर जहाजाला कालव्याच्या समांतर वळवण्यात यश मिळाले. सरतेशेवटी जहाज पाण्यावर तरंगले आणि सर्व जगताने सुटकेचा निःश्वास टाकला.

जहाजावरचे सर्व कर्मचारी भारतीय आहेत. जागतिक वाणिज्य सामुद्रिकी मध्ये भारताचे निर्विवाद वर्चस्व आहे. जहाजाला परत तरंगवण्याकरिता जहाजावरील कर्मचाऱ्यांचे प्रयत्न हे डच सॅल्वेज कंपनी इतकेच किंबहुना जास्तच आहेत.

How giant ship freed in Suez cannel

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*