चीनशी हिंसक संघर्षात आणि वाटाघाटींमध्ये भारताने एक इंचही भूमी गमावलेली नाही; लष्करप्रमुख जनरल नरवणेंची ग्वाही

वृत्तसंस्था

नवी दिल्ली – चीनी सैन्याशी गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षात भारताने एक इंचही भूमी गमावलेली नाही. चीनशी त्या हिंसक संघर्षानंतर झालेल्या कॉर्प्स कमांडर्सच्या ९ बैठकांनंतर उभयपक्षी सुरक्षित ठरेल, असाच समझोता झालेला आहे, अशी ग्वाही लष्करप्रमुख जनरल मनोज मुकूंद नरवणे यांनी आज दिली आहे.

बऱ्याच दिवसांनंतर चीनशी झालेल्या संघर्षाची बातमी आली. त्यानंतर वाटाघाटींची बातमी आली. त्यावर जनरल नरवणे यांनी सविस्तरपणे भारताची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, की भारताने चीनशी झालेल्या हिंसक संघर्षात आणि नंतरच्या वाटाघाटींमध्ये एक इंचही भूमी गमावलेली नाही.

कॉर्प्स कमांडर्सच्या ९ बैठकांनंतर उभयपक्षी सुरक्षित ठरेल आणि मान्य होईल, असाच समझोता झाला आहे. चीनी सैन्याच्या तुकड्या उभयपक्षी ठरलेल्या नियोजनानुसार १० फेब्रुवारीपासून मागे जाण्यास सुरूवात झाली. आता चीनी सैन्य पँगाँग त्से सरोवराच्या उत्तर आणि दक्षिण तीरावरून, कैलास पर्वताच्या रांगांमधून मागे हटले आहे. ते त्यांच्या हद्दीतील जवळच्या कायमच्या लोकेशन्सवर गेले आहेत.चीनी सैन्य हटल्यामुळे एलएसीवर तुलनात्मक दृष्ट्या शांतता आहे. भारताच्या सैन्य तुकड्या आपल्या पोझीशन्सवर तशाच तैनात आहेत. गलवानसारख्या हिंसक संघर्षाची शक्यता कमी झाली आहे. तरीही भारतीय सैन्य सावध आहे, असेही जनरल नरवणे यांनी स्पष्ट केले.

पाकिस्तानात दहशतवाद्यांचे अड्डे कायम

पाकिस्तानात दहशतवाद्यांचे अड्डे कायम आहेत. सध्या तेथे बर्फ आहे. त्यामुळे त्यांच्या कारवाया थंडावल्यासारखे वाटते. भारतीय लष्कराची त्यांच्या हालचालींवर बारकाईने नजर आहे. दहशतवाद्यांचे अड्डे उद्वस्त करण्यात पाकिस्तान किती गंभीर आहे हे लवकरच कळेल. अन्यथा भारतीय लष्कराला ते काम करणे अवघड नाही, असा इशाराही जनरल नरवणे यांनी दिला.

 

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*