विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशात गेल्या वर्षभरापासून कहर घालणाऱ्या कारोनाच्या साथीमुळे देशाचे अपरिमीत नुकसान झाले आहेच. देशात आत्तापर्यंत तब्बल ४४, ७६६ जवानांना कोरोना विषाणुचा संसर्ग झाला. त्यापैकी ११९ जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. 119 soldiers died due to Corona
राज्यसभेत यासंदर्भातील एका प्रश्नाला उत्तर देताना संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक म्हणाले, की लष्करातील ३३, ००३ जवानांना कोरोना झाला तर ८१ जवानांचा मृत्यू झाला. नौदलात ३,६०४ व हवाई दलात ८,१५९ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला. दोन्ही दलांत अनुक्रमे दोन व ३६ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. थोडक्यात कोरोनाचा फटका लष्कराच्या तिन्ही दलांना कमी अधिक प्रमाणात बसला आहे.
सध्या देशात कोरोनाची साथ आटोक्यात येत असतानाच महाराष्ट्र व केरळ या राज्यात मात्र पुन्हा कोरोनाने कहर सुरु केला आहे. या दोन्ही राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याचे मानले जाते. त्यामुळे या राज्यावर केंद्र सरकारने खास लक्ष केंद्रित केले आहे. महाराष्ट्रात तर काही ठिकाणी पुन्हा लॉकडाउन लागू करण्याच्या पर्यायावर सरकार गांभीर्याने विचार करीत आहे.