विशेष प्रतिनिधी
मुंबई : ‘आपण देशात तिसऱ्यांदा सरकार बनवले आहे. त्यामुळे लोकसभेला महाराष्ट्रात आलेली निराशा झटकून टाका. कोणत्याही सर्व्हेचा विचार करू नका. या वेळीही राज्यात महायुतीचेच सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष आहे. एकदा का महाराष्ट्रात आपले सरकार आले की समान नागरी कायदा आणण्यापासून आपल्याला कुणीही रोखू शकत नाही,’ असा विश्वास भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ( Amit Shah ) यांनी मंगळवारी मुंबईत व्यक्त केला.
एवढेच नाही तर 2029 मध्ये भाजपला स्वबळावर सत्ता आणायची आहे, असे आव्हानही त्यांनी आपल्या पक्ष कार्यकर्त्यांना दिले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. 2029 मध्ये भाजप स्वबळावर सत्ता आणेल, या अमित शाह यांच्या घोषणेने महायुतीतील मित्रपक्ष शिंदेसेना व अजित पवार गट अस्वस्थ झाला आहे. यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. पण इतर राज्ये व महाराष्ट्राची परिस्थिती वेगळी आहे. इथे 1985 नंतर 40 वर्षांत कधीच एका पक्षाचे सरकार आले नाही. कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी नेत्यांना असे बोलावेच लागते.’
भाजपमधील मतभेद मिटवण्याची सर्वच नेते, पदाधिकाऱ्यांना दिली तंबी
शाह म्हणाले, केवळ हारतुरे घालून निवडणूक जिंकता येत नाही. प्रत्येक बूथवर १० टक्के मतदान वाढवण्यासाठी प्रयत्न करा. असे झाले तर मग आपल्याला सत्तेवर येण्यापासून कुणी रोखू शकत नाही. जे भाजपचे मतदार नाहीत, त्या कुटुंबांशी संपर्क साधून त्यांना आपलेसे करा. आपल्या सरकारने केलेल्या चांगल्या कामाची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवा. महाराष्ट्राची निवडणूक देशाची दशा व दिशा बदलणारी निवडणूक आहे. त्यामुळे नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आपापसातील मतभेद संपवावेत. कोणत्याही नेत्या, पदाधिकाऱ्यापेक्षा पक्ष मोठा असताे. आपला पक्ष सत्तेत येण्यासाठी काम करत राहा.
या दौऱ्यात शाह यांनी कोपरखैरणे येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जुन्या स्वयंसेवकांशीही बंदद्वार चर्चा केली. लोकसभा निवडणुकीत संघाचे स्वयंसेवक फारसे सक्रिय न राहिल्याने भाजपला मोठा फटका बसला. आता विधानसभेसाठी त्यांना सक्रिय करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. ‘महाराष्ट्रातील प्रश्न सोडवण्यासाठी देवेंद्र फडणवीस सक्षम आहेत’ असे सांगून अमित शाह यांनी तूर्त फडणवीसांना दिल्लीत नेण्याचा कुठलाही विचार नसल्याचे संकेत दिले.
प्रदेश भाजपचे नेते निवडणुकीबाबत जी रणनीती आखतील ती अगदी मंडल, बूथ, वॉर्ड स्तरापर्यंत राबवा. आपला बूथ पातळीवरचा कार्यकर्ता जितका जोमाने काम करेल, तितका आपला विजय नक्की. केंद्र व राज्यातील सरकारने देशाच्या विकासासाठी मोठे काम केले. महाराष्ट्राला आणखी प्रगतिपथावर न्यायचे आहे, त्यामुळे महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील, यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन शाह यांनी केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more