ठाकरे – पवार सरकार हटवून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी करण्यामागे प्रकाश आंबेडकरांचा हेतू काय…??; परिणाम काय…??

विनायक ढेरे

मुंबई : महाराष्ट्राचा खुद्द गृहमंत्रीच खंडणीखोरी करतो, हा नुसता कायदा आणि सुव्यवस्थेला धोका नसून राजकीय गुन्हेगारीकरणाला राजाश्रय आहे, असे सांगत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी करीत आहेत… पण अशी मागणी करून ते नेमके काय साध्य करू इच्छित आहेत, हे पाहणे राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे ठरेल. Prakash Ambedkar to remove the Pawar government and demand presidential rule in Maharashtra

सध्याच्या महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकारविरोधातली ही मागणी असल्याने प्रकाश आंबेडकरांवर त्ते भाजपची बी टीम असल्याचा आरोप करणे स्वाभाविक मानले पाहिजे… पण ती तेवढीच वस्तुस्थिती नाही. किंबहुना राजकारणाची समज असणारी कोणतीही व्यक्ती या आरोपातील तथ्यावर विश्वास ठेवणार नाही.प्रकाश आंबेडकरांचा भाजप आणि संघ परिवाराला वैचारिक आणि सैद्धांतिक विरोध सर्वश्रूत आहे. त्यांनी पूर्वी शरद पवारांच्या बरोबर जाऊन अखंड काँग्रेसशी राजकीय समझोता केला आहे पण भाजप किंवा हिंदुत्ववादी शिवसेनेशी कधी युती – आघाडी केलेली नाही.

हा मुद्दा लक्षात घेतला तर प्रकाश आंबेडकरांवर फक्त भाजपशी छुपा समझोता केल्याचा आरोप होऊ शकतो… पण तसा तो शरद पवारांवरही होत आला आहे किंबहुना शरद पवार – भाजप हे साटेलोटे जुने आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांवरील या छुप्या समझोत्याचा आरोपही तितकासा टिकत नाही.

मग प्रकाश आंबेडकर सध्याचे ठाकरे – पवार सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवटीची मागणी का करताहेत… याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. आणि तसे पाहिले तर एक गोष्ट लक्षात येईल, ती म्हणजे प्रकाश आंबेडकर हे सिरियसली स्वतःकडे महाराष्ट्रातला तिसरा राजकीय फोर्स म्हणून पाहात आहेत, ही आहे…

दोन्ही काँग्रेस बरोबर गेलेली शिवसेना विरुध्द भाजप या लढाईत या दोन्ही अथवा सर्व पक्षांच्या विरोधात असलेले राजकीय फोर्सेस आणि मतदार एकत्र करण्याला प्रकाश आंबेडकर हे प्राधान्य देतात, हे लक्षात येईल आणि घ्यावे लागले.

या तिसऱ्या राजकीय फोर्सची आणि मतदारांची ताकद तीन पक्षांची महाविकास आघाडी आणि भाजप यांच्या ताकदीच्या बरोबरीची किंवा खालोखालची नक्की आहे. ती संघटित स्वरूपात आणण्याची प्रकाश आंबेडकरांची सिरियसली धडपड सुरू आहे.

शिवाय महाराष्ट्रातली सध्या परिस्थिती ही मीडिया नॅरेटिव्हच्या पलिकडे जाऊन सामान्य माणसाच्या दृष्टीने पाहिली तर खरोखरच गंभीर आहे. खुद्द गृहमंत्र्यांवर १०० कोटींच्या खंडणीखोरीचा आरोप होणे ही खरोखर गंभीर बाब आहे. नव्हे, ती सुप्रिम कोर्टापर्यंत पोहोचली आहे.

ठाकरे – पवार सरकार कोविडपासून कायदा – सुव्यवस्थेपर्यंत सगळ्याच आघाड्यांवर अपयशी ठरलेले दिसते आहे. यासाठी भाजपचा चष्मा लावून पाहण्याची गरज नाही. शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांचे फेसबुक लाइव्ह पलिकडे कर्तृत्व दिसलेले नाही. राष्ट्रवादीची जातीवादी दादागिरी आणि खाबूगिरी वाढून तो पक्ष परत २०१४ पूर्वीच्या वळणावर सत्तेच्या वर्षभरातच येऊन पोहोचल्याचे दिसत आहे… आणि काँग्रेस नावाच्या पक्षाची शिवसेना आणि राष्ट्रवादीमागे फरफट होताना दिसते आहे.

अशा स्थितीत आपला तिसरा फोर्स संघटित करायला कोणी लागले नाही, तरच नवल… प्रकाश आंबेडकर हे त्याच कामाला लागले आहेत. यात त्यांना काँग्रेसच्या घटता जनाधार आपल्या बाजूने वळण्याची आशा करायलाही जागा आहे. कारण काँग्रेसच्या संघटनात्मक अवस्थेने रसातळ गाठला आहे. ठाकरे – पवार सरकारमध्ये काँग्रेसने तिय्यम स्थान घेणे यापेक्षा दुसरी नव्हे, तर तिसरीही गिनती असू शकत नाही.

त्यामुळे प्रकाश आंबेडकरांना तिसऱ्या राजकीय फोर्ससाठी काँग्रेसच्या घटत्या जनाधारातून रसद मिळू शकते. ती ते गोळा करण्यासाठी तत्पर झाले आहेत.-महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा, हे वक्तव्य करण्यामागे प्रकाश आंबेडकरांचे वर उल्लेख राजकीय आडाखे असू शकतात, असे वाटते.

 Prakash Ambedkar to remove the Pawar government and demand presidential rule in Maharashtra

 

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*