सचिन वाझेच्या हजेरीतच मनसुख हिरेन हत्येचा कट; एनआयएचा दावा; मात्र कट करणाऱ्या व्यक्तीच्या नावाचा एनआयएकडून अद्याप उच्चार नाही

वृत्तसंस्था

मुंबई – मनसुख हिरेन यांच्या हत्येचा कट शिजला त्यावेळी सचिन वाझे तिथे हजर होता, असा दावा राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयएने न्यायालयात केला. त्यानंतर न्यायालयाने सचिन वाझेच्या एनआयए कोठडीत ७ एप्रिलपर्यंत वाढ केली. mansukah hiren murder case; special court extends NIA custody for sachin vaze upto 7th april

एनआयएने न्यायालयात महत्त्वाची माहिती दिली आहे. मनसुख हिरेन यांच्या हत्येचा कट ज्या बैठकीत रचण्यात आला, तिथे वाझेही उपस्थित होते, असा दावा एनआयएने केला आहे. मनसुख हिरेन यांच्या हत्येचा कट एका बैठकीत रचण्यात आला. त्या बैठकीला सचिन वाझे आणि विनायक शिंदे हजर होते. हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीशी संपर्क करण्यासाठी सचिन वाझेंनी मोबाईलचा वापरही केला होता.यावेळी एनआयएने कट रचणाऱ्या आरोपीच्या नावाचा न्यायालयात उल्लेख केला नाही. मात्र, तपास यंत्रणा हत्येमागील कटाचा आणि त्याच्या उद्देशाचा छडा लावण्याच्या खूप जवळ पोहचली असल्याचे एनआयएच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले. एनआयएच्या युक्तिवादानंतर विशेष न्यायालयाचे न्यायाधीश पी. आर. सीत्रे यांनी आरोपी विनायक शिंदे आणि नरेश गोर यांच्या एनआयए कोठडीचा कालावधी ७ एप्रिलपर्यंत वाढवून दिला.

मनसुख हिरेन यांची हत्या करण्यामागील हेतू काय होता? या कारणाच्या खूप जवळ पोहोचलो असल्याचं एनआयएने न्यायालयात सांगितलं. यावेळी आरोपी विनायक शिंदे याचा या गुन्ह्यात कसल्याही प्रकारचा सहभाग नसल्याचा युक्तिवाद शिंदेचे वकील गौतम जैन यांनी केला. सीम कार्ड देण्याव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारे आरोपीला या प्रकरणात जबाबदार ठरवलं गेलेले नाही, असे जैन म्हणाले. शिंदे ९ दिवसांपासून तपास यंत्रणांच्या कोठडीत असून, त्याला आणखी कोठडी देण्याची गरज नसल्याचा युक्तिवादही जैन यांनी केला. दुसरीकडे नरेश गोर यांचा या प्रकरणात फक्त सीमकार्ड पुरवण्यापर्यंतच सहभाग आहे. त्यांना खोट्या प्रकरणात अडकवण्यात आल्याचा युक्तिवाद गोर यांचे वकील अफताब डायमंडवाले यांनी केला. पण न्यायालयाने सुनावणी अंती दोघांच्याही एनआयए कोठडीत ७ एप्रिलपर्यंत वाढ केली.

mansukah hiren murder case; special court extends NIA custody for sachin vaze upto 7th april

 

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*