मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंकडे कार्यभार असलेल्या वनखात्याची लक्तरे, महिला वनाधिकाऱ्याने वरिष्ठांच्या छळाला कंटाळून केली आत्महत्या

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे कार्यभार असलेल्या वनखात्याची लक्तरे पुन्हा उघड झाली आहेत. एका तरुण महिला वनाधिकाऱ्याने वरिष्ठांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. कच्चा रस्त्यावरून ड्युटीनिमित्त फिरायला लावताना अ‍ॅबॉर्शन झाल्यावर त्यांना सुट्टी देण्यात आली नाही. अश्लिल बोलून त्यांचा मानसिक छळ करण्यात आला.


विशेष प्रतिनिधी

अमरावती : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे कार्यभार असलेल्या वनखात्याची लक्तरे पुन्हा उघड झाली आहेत. एका तरुण महिला वनाधिकाऱ्याने वरिष्ठांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. कच्चा रस्त्यावरून ड्युटीनिमित्त फिरायला लावताना अ‍ॅबॉर्शन झाल्यावर त्यांना सुट्टी देण्यात आली नाही. अश्लिल बोलून त्यांचा मानसिक छळ करण्यात आला.

Female forest officer commits suicide after being harassed by her superiors

क्षेत्रीय वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण असे या तरुण अधिकाऱ्याचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी उपवनसंरक्षक शिवकुमार यांच्याविषयी त्यांनी अप्पर वनसंरक्षक रेड्डी यांच्याकडे अनेकदा तक्रारी केल्या होत्या. मात्र, त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे शेवटी कंटाळून त्यांनी गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली.

संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर वनखात्याचा कारभार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे आहे. मात्र, सध्या वनविभागाचा कारभार बेबंद झाला असल्याचे या आत्महत्या प्रकरणाने समोर आले आहे.

दीपाली चव्हाण यांनी लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटमध्ये शिवकुमार यांच्याकडून झालेल्या छळाची कहाणी मांडली आहे. रात्री बेरात्री त्यांना कोठेही बोलावले जात होते. त्यांच्याशी अश्लिल भाषेत बोलले जात होते. याची तक्रार त्यांनी वनसंरक्षकांकडे केली. मात्र, त्यांना ऐकून घेतले नाही. मेळघाटात असल्याने  वरिष्ठांच्या मर्जीशिवाय बदली होत नसल्याने या सगळ्या प्रकाराने त्या वैफल्यग्रस्त झाल्या होत्या. त्या गरोदर असतानाही शिवकुमार यांनी त्यांना कामासाठी कच्चा रस्त्यातून फिरविले. यामुळे त्यांचे अ‍ॅबॉर्शन झाले. तरीही देखील सुट्टी दिली गेली नाही. त्यांचे सासर अमरावती येथेच असतानाही महिन्यातून एकदाही त्यांना घरी जाता  येत नव्हते.विनोद शिवकुमार अनेकदा रात्री त्यांना कार्यालयात बोलावून घ्यायचे. कधी कधी कॅम्पवर बोलायचे. दीपाली यांच्या एकटेपणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मात्र, दीपाली त्यांच्या मर्जीने वागत नाहीत पाहून त्यांचा छळ सुरू केला.

चव्हाण यांना ते वारंवार निलंबित करण्याची धमकी देत होते. त्यांना आदिवासींविरुध्द कारवाई करण्यास भाग पाडत होते. यामध्ये आदिवासींकडून त्यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना जामीन मिळाला नाही. मात्र, वनविभागाच्या कामासाठी हे होऊनही त्यांचा पगार कापण्यात आला. पुन्हा कामावर रुजू करून घेण्यास नकार देण्यात आला.
धक्कादायक बाब म्हणजे वनखात्याच्या वतीने करण्यात आलेल्या कामांचे पैसेही दीपाली चव्हाण यांना मिळाले नाहीत. गावांचे पुनर्वसन करण्यासाठी निधी नाकारण्यात आला. या गावांमध्ये वनपाल आणि वनरक्षकांची पदे भरली नाहीत. त्यामुळे दीपाली यांच्यावर कामाचा ताण  वाढला होता.

आपण हे अनेकदा लिहूनही शिवकुमार यांच्यावर कारवाई होत नाही याचे कारण वरिष्ठांचाच त्यांच्या डोक्यावर हात आहे, अशी खंतही दीपाली चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. आपल्या मृत्यूनंतर तरी रोखलेले वेतन आणि इतर आर्थिक लाभ आईला द्यावेत.

आपल्या मृत्यूला वनविभागच जबाबदार आहे. माझा छळ झाला तसा इतरांचा तरी होऊ नये. शिवकुमार याच्याबाबत साततत्याने तक्रारी येत असल्याने त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणीही दीपाली चव्हाण यांनी केली आहे.

दरम्यान,  दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याला नागपूर रेल्वेस्थानकावर अटक करण्यात आली. विनोद शिवकुमार बंगळूरला जात असल्याची माहिती अमरावती पोलिसांना मिळाली. त्यांनी ही माहिती नागपूर लोहमार्ग पोलिसांना दिली.  तो रेल्वे गाडी ०२२९६ दिल्ली बंगळूर एक्सप्रेस मध्ये बसण्याच्या तयारीत असताना ९.३० वाजता त्यास अटक करण्यात आली. अटक केल्यानंतर अमरावती पोलीस त्यास अमरावतीला घेऊन गेले.

Female forest officer commits suicide after being harassed by her superiors

 

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*