मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अखेर निर्णय घेतला, दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. एस.रेड्डी यांना केले निलंबित

वनखात्याचा कार्यभार असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अखेर निर्णय घेतला आहे. हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्याप्रकरणी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक तथा अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांचे मंगळवारी निलंबन करण्यात आले Dipali Chavan suicide case: Chief forest conservator M.S.Reddy suspended


विशेष प्रतिनिधी

मुंबई : वनखात्याचा कार्यभार असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अखेर निर्णय घेतला आहे. हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्याप्रकरणी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक तथा अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांचे मंगळवारी निलंबन करण्यात आले.

महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मंगळवारी भेट घेतली. यावेळी रेड्डी यांच्या निलंबनाची मागणी लावून धरली. मुख्यमंत्री कार्यालयातून विशेष बाब म्हणून रेड्डी यांच्या निलंबनाचे आदेश काढण्यात आले.

वरिष्ठांच्या छळाला कंटाळून दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या केली होती. कच्चा रस्त्यावरून ड्युटीनिमित्त फिरायला लावताना अ‍ॅबॉर्शन झाल्यावर त्यांना सुट्टी देण्यात आली नाही. अश्लिल बोलून मानसिक छळ करण्यात आला, असे दीपाली यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटले होते.

आत्महत्या करण्यापूर्वी उपवनसंरक्षक शिवकुमार यांच्याविषयी त्यांनी अप्पर वनसंरक्षक रेड्डी यांच्याकडे अनेकदा तक्रारी केल्या होत्या. मात्र, त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे शेवटी कंटाळून त्यांनी गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली.

संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर वनखात्याचा कारभार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे आहे. मात्र, सध्या वनविभागाचा कारभार बेबंद झाला असल्याचे या आत्महत्या प्रकरणाने समोर आले आहे. दीपाली चव्हाण यांनी लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटमध्ये शिवकुमार यांच्याकडून झालेल्या छळाची कहाणी मांडली होती.

विनोद शिवकुमार अनेकदा रात्री त्यांना कार्यालयात बोलावून घ्यायचे. कधी कधी कॅम्पवर बोलायचे. दीपाली यांच्या एकटेपणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मात्र, दीपाली त्यांच्या मर्जीने वागत नाहीत पाहून त्यांचा छळ सुरू केला.

चव्हाण यांना ते वारंवार निलंबित करण्याची धमकी देत होते. त्यांना आदिवासींविरुध्द कारवाई करण्यास भाग पाडत होते. यामध्ये आदिवासींकडून त्यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना जामीन मिळाला नाही. मात्र, वनविभागाच्या कामासाठी हे होऊनही त्यांचा पगार कापण्यात आला. पुन्हा कामावर रुजू करून घेण्यास नकार देण्यात आला.

धक्कादायक बाब म्हणजे वनखात्याच्या वतीने करण्यात आलेल्या कामांचे पैसेही दीपाली चव्हाण यांना मिळाले नाहीत. गावांचे पुनर्वसन करण्यासाठी निधी नाकारण्यात आला. या गावांमध्ये वनपाल आणि वनरक्षकांची पदे भरली नाहीत. त्यामुळे दीपाली यांच्यावर कामाचा ताण वाढला होता.

आपण हे अनेकदा लिहूनही शिवकुमार यांच्यावर कारवाई होत नाही याचे कारण वरिष्ठांचाच त्यांच्या डोक्यावर हात आहे, अशी खंतही दीपाली चव्हाण यांनी व्यक्त केली होती.
दीपाली चव्हाण यांनी थेट आरोप करूनही रेड्डी यांच्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ करण्यात येत होती.

Dipali Chavan suicide case: Chief forest conservator M.S.Reddy suspended

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*