‘ ए भाई…डिवचायच न्हायं…’ अमृता फडणवीसांचं आक्रमक ट्वीट ; भाई जगताप यांना चोख प्रत्युत्तर; ‘ती’ खाती काँग्रेस-राष्ट्रवादी काळातच अ‍ॅक्सिस बँकेत वर्ग

विशेष प्रतिनिधी

मुंबई: गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून राज्यातील जोरदार गदारोळ सुरू आहे. गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी पोलिसांच्या बँक खात्यावरून खोचक टोमणा मारला होता.जगताप यांच्या या टोमण्याला देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी आक्रमक उत्तर दिलं आहे. ‘सरळ व्यक्तींना डिवचायचं नाही’, असा इशाराही अमृता यांनी जगताप यांना दिला आहे. Amruta Fadnavis Criticises Bhai Jagtap

भाई जगताप यांनी बोचऱ्या शब्दांत टीका केली होती. ‘सत्तेत असताना फडणवीसांनी राज्यातील पोलिसांची खाती स्वतःच्या बायकोच्या बँकेत कशाच्या आधारावर वर्ग केली होती? त्यांचं डोकं ठिकाणावर नाहीए,’ असं जगताप म्हणाले होते.जगताप यांनी बँक खात्यांबद्दल उपस्थित केलेल्या मुद्द्यामुळं अमृता फडणवीस संतापल्या आहेत. भाई जगताप यांना दम भरत अमृता फडणवीसांनी इशारा दिला आहे. ‘ए भाई, तू जो कोणी असशील. माझ्यावर बोट उचलायचं न्हाय! पोलिसांची खाती तुमच्याच राज्यात तुम्ही यूटीआय व अॅक्सिस बँकेला योग्यता पाहून दिली होती. लक्षात ठेव, सरळ रस्त्याने चालणाऱ्या माणसांना डिवचायचं न्हाय,’ असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.

अमृता फडणवीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही थेट टीका करायला मागेपुढे पाहत नाहीत. मात्र, त्यांच्या आताच्या ट्विटमधील भाषा नेहमीपेक्षा खूपच आक्रमक आहे. त्यामुळे आता भाई जगताप या ट्विटला काय प्रत्युत्तर देणार, याकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्या आहेत.

काय आहे प्रकरण?

महाराष्ट्र राज्य पोलिस विभागात दोन लाखाहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांचे वार्षिक पगार 11 हजार कोटींपेक्षा जास्त आहेत. काही वर्षांपूर्वी पोलिस विभागातील बहुतांश वेतन खाती ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’कडून अ‍ॅक्सिस बँकेत हस्तांतरित करण्यात आली होती. माजी मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीस ‘अ‍ॅक्सिस बँके’त उच्च पदावर कार्यरत असल्यामुळे याचा संबंध जोडला जात होता.

देवेंद्र फडणवीस यांचं स्पष्टीकरण काय?

अ‍ॅक्सिस बँक किंवा सरकारी खात्यांशी संबंधित बँकांची निवड मागील काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने केली होती. जर सरकारमधील एखाद्याला असं वाटतं, की माझी पत्नी त्या बँकेत काम करते, म्हणून ते माझ्या सरकारची बदनामी करु शकतात, तर तसं होणार नाही. माझी पत्नी कधीच सरकारी कार्यालयात आली नाही किंवा पाच वर्षांत एखाद्या सरकारी अधिकाऱ्याशी तिने भेट घेतलेली नाही, असं स्पष्टीकरण फडणवीस यांनी दिलं होतं.

Amruta Fadnavis Criticises Bhai Jagtap

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*