अधिकाधिक युवकांचा विज्ञानात रस वाढायला हवा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन

आज अधिकाधिक युवकांचा विज्ञानाकडे कल वाढावा, त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित व्हावा, यासाठी प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी, आपल्याला इतिहासातील विज्ञानाची आणि विज्ञानाच्या इतिहासाची अशी दोन्ही बाजूने संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : आज अधिकाधिक युवकांचा विज्ञानाकडे कल वाढावा, त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित व्हावा, यासाठी प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी, आपल्याला इतिहासातील विज्ञानाची आणि विज्ञानाच्या इतिहासाची अशी दोन्ही बाजूने संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

वैश्विक भारतीय वैज्ञानिक-म्हणजेच वैभव या आंतरराष्ट्रीय आभासी शिखर परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान बोलत होते. 55 देशांमधील तीन हजारांपेक्षा अधिक भारतीय वंशाचे अभ्यासक आणि वैज्ञानिक या परिषदेत सहभागी झाले आहेत. तसेच भारतातील दहा हजार संशोधक आहेत. दोनशे संस्था आणि माहिती तंत्रज्ञान संस्थांनी ही परिषद आयोजित केली आहे. 40 देशातील 700 व्याख्याते आणि 629 भारतीय व्याख्याते या परिषदेत सहभागी होणार आहेत. एकूण 213 सत्र या परिषदेत होणार असून त्यात विविध विषयांवर मंथन होणार आहे.

वैभव या शिखर परिषदेत, भारत आणि जगातील विज्ञान तसेच इनोव्हेशनविषयी चर्चा केली जाते. ही परिषद म्हणजे, उत्तम, बुद्धिमान व्यक्तींचा संगम आहे, असे सांगून पंतप्रधान मोदी म्हणाले की, अशा संमेलनातून आपण भारत आणि आपल्या पृथ्वीला अधिक सक्षम करण्यासाठी आपले दीर्घकालीन सहकार्य अधिक दृढ करत असतो. भारत सरकारने वैज्ञानिक संशोधन आणि नवोन्मेषाला चालना देण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. कारण देशात सामाजिक-आर्थिक परिवर्तन घडवण्याच्या सर्व प्रयत्नांच्या केंद्रस्थानी विज्ञानच आहे. भारतात, आतापर्यंत 25 नवोन्मेष तंत्रज्ञानयुक्त प्रयोगशाळा सुरु करण्यात आल्या आहेत आणि यामुळे देशातील स्टार्टअप व्यवस्थेला पाठबळ मिळेल.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, लस विकसित करण्याच्या कार्यात दीर्घकाळ आलेला विराम आता संपला आहे. 2014 साली आमच्या लसीकरण कार्यक्रमासाठी चार नव्या लस विकसित करण्यात आल्या आहेत. यात भारतीय लस रोटा व्हायरसचाही समावेश आहे.

राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 चा उल्लेख करत मोदी म्हणाले की, तीस वर्षांनंतर आणि संपूर्ण देशव्यापी विस्तृत सल्लामसलत केल्यानंतर हे धोरण आणले गेले आहे. या धोरणाचा उद्देश विज्ञानाविषयी विद्यार्थ्यांच्या मनात कुतूहल जागे करणे हा असून, त्यात वैज्ञानिक संशोधनाला चालना देण्यावर भर देण्यात आला आहे. युवा गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी या धोरणात मुक्त आणि व्यापक पर्यावरण देण्याची व्यवस्था आहे. यामुळे देशातील स्टार्टअप क्षेत्र आणि उत्पादन क्षेत्राला चालना मिळेल. भारताला आज आपल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी उत्तम दर्जाच्या संशोधनाची गरज आहे. देशात डाळी आणि अन्नधान्याचे उत्पादन वाढवण्यासाठी वैज्ञानिकांनी दिलेल्या योगदानाचे त्यांनी कौतुक केले. जेव्हा भारत प्रगती करतो, तेव्हाच जग प्रगती करते.

वैभव हे देशातील प्रतिभावान लोकांचे संमेलन असून, यातून संशोधनासाठीची आदर्श व्यवस्था निर्माण करण्यास मदत होईल, परंपरेचा आधुनिकतेशी संगम करुन आपल्याला समृद्धी निर्माण करायची आहे, असे मोदी म्हणाले. या देवघेवीतून त्यासाठी निश्चित लाभ मिळेल आणि शिक्षण तसेच संशोधन यांच्यात समन्वयासाठी देखील हा अनुभव उपयुक्त ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*