ट्रॅक्टरमध्ये सोफा टाकून बसणारे व्हीआयपी शेतकरी, राहुल गांधी यांच्यावर स्मृती इराणी यांचा हल्ला

ट्रॅक्टरमध्ये सोफा टाकून बसणारे राहुल गांधी हे व्हीआयपी शेतकरी आहेत. त्यांना शेतकऱ्यांची दु:खे काय समजणार अशी टीका केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केली आहे.


वृत्तसंस्था

अहमदाबाद : ट्रॅक्टरमध्ये सोफा टाकून बसणारे राहुल गांधी हे व्हीआयपी शेतकरी आहेत. त्यांना शेतकऱ्यांची दु:खे काय समजणार अशी टीका केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केली आहे.

अहमदाबाद येथे भारतीय जनता पक्षच्या मुख्यालयात पत्रकारांशी बोलताना इराणी यांनी नव्या कृषी कायद्यांविरोधात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंजाबमध्ये काढलेल्या शेतकरी बचाव रॅलीची चांगलीच खिल्ली उडविली. सत्तेत आल्यास कृषी कायदे रद्द करु, या राहुल गांधी यांच्या विधानावर बोलताना इराणी म्हणाल्या.

दलालांपासून छोट्या अल्पभूधारक शेतकऱ्यांची सुटका त्यांना नको आहे. त्यामुळे त्यांचा या कायद्यांना पाठींबा नाही. राहुल गांधींचं सत्तेत येण्याचं स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही. संसदीय परंपरांचा आदर करण्याचा त्यांचा स्वभावचं नाही.

कृषी कायद्यांचे समर्थन करताना इराणी म्हणाल्या, नवे कायदे शेतकऱ्यांना त्यांचं पीक कोणालाही कोठेही योग्य किंमतीत विकण्याचा अधिकार देतात. मात्र, यातील दलाल संस्कृती कायम ठेवण्यासाठीच काँग्रेसचं राजकारण सुरु आहे.

नवीन सुधारणा कायद्यानुसार कंत्राटी शेतीतही मालकी शेतकऱ्यांकडेच राहील याची खात्री देण्यात आली आहे. कंत्राट हे फक्त पिकांच्या बाबतीत असेल. कंत्राटी शेतीमुळे नवीन तंत्रज्ञान, नवीन बियाणे आणि गुंतवणूक कृषी क्षेत्रात येईल. कित्येक वर्षे कमी उत्पादकता या एकाच गंभीर समस्येने शेतकऱ्यांना भेडसावले होते. कृषी क्षेत्रातील गुंतवणूक वाढली की तंत्रज्ञानाचा वापर वाढेल तसेच नवीन बियाणांमुळे उत्पादकताही वाढेल, असे इराणी म्हणाले.

कॉंग्रेसवर हल्ला करताना स्मृती इराणी म्हणाल्या की, कृषी सुधारणांबद्दल अनेक अफवा पसरवल्या आहेत आणि हेतूपुरस्सर पसरवल्या जात आहेत. मात्र यात काही तथ्य नाही.

कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे अस्तित्व अबाधित राहील. तसेच किमान हमी भावाची पद्धतही सुरू राहील. आपल्या शेतकऱ्यांचे सर्वात मोठे दुर्दैव आहे आहे की मध्यस्थाला शेती करण्याचा काहीही अनुभव नसताना शेतकऱ्यांपेक्षा जास्त मोबदला मिळतो. अशा मध्यस्थांचे हितसंबंध दुखावले गेल्यामुळे या कायद्याविरुद्ध आवाज उठवला जात आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*