दहशतवादी पाकिस्तानशी संबंध सुधारणे कठीणच, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचा आरोप

पाकिस्तान सरकारने दहशतवाद हे जाहीरपणे स्वीकारलेले धोरण आहे, ज्याला ते योग्य मानतात. त्यामुळे पाकिस्तानशी संबंध सुधारणे खूप कठीण झाले आहे, अशी टीका परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी केली आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पाकिस्तान सरकारने दहशतवाद हे जाहीरपणे स्वीकारलेले धोरण आहे, ज्याला ते योग्य मानतात. त्यामुळे पाकिस्तानशी संबंध सुधारणे खूप कठीण झाले आहे, अशी टीका परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी केली आहे.

आशिया सोसायटीतर्फे आयोजित एका ऑनलाईन कार्यक्रमास संबोधित करताना ते बोलत होते. एस.जयशंकर म्हणाले की, फक्त दहशतवादच नाही तर पाकिस्तान भारताबरोबर सामान्य व्यापारही करत नाही. मोस्ट फॅव्हर्ड नेशन्स (एमएफएन) हा दर्जाही दिलेला नाही.

व्हिसा संदर्भात भारताचे पाकिस्तानशी संबंध फार चांगले नाही. या प्रकरणात त्यांच्या खूप अटीशर्ती आहेत. त्यांनी भारत आणि अफगाणिस्तान आणि अफगाणिस्तान ते भारता दरम्यानचा संपर्क खंडित केला आहे. शेजारी देश व्हिसा आणि व्यावसायिक संबंध चांगले ठेवतात, तसेच कनेक्टिव्हिटी प्रदान करतात.

महत्त्वाचे म्हणजे पाकिस्तान जोवर दहशतवादाला चालना देणे थांबवत नाही तोपर्यंत या विचित्र देशाशी सामान्य संबंध कसे प्रस्थापित होतील, असा प्रश्न जयशंकर यांनी उपस्थित केला. ते म्हणाले की, आमच्या परराष्ट्र धोरणासाठी हा कठीण विषय आहे. जम्मू काश्मीरचं दोन केंद्रशासित राज्यांमध्ये झालेल्या विभाजनावर बोलताना जयशंकर म्हणाले की, भारताने बाह्य सीमा बदलल्या नाहीत.

आमच्या शेजारील देशांचा यात संबंध नाही. हा आमचा अंतर्गत प्रश्न आहे. प्रत्येक देशाला प्रशासकीय कार्यकक्षा बदलण्याचा अधिकार आहे. चीनसारख्या देशानेही त्यांच्या प्रांतांच्या सीमा बदलल्या आहेत आणि मला विश्वास आहे की इतर बरेच देश असं करतात. जेव्हा तुमची बाह्य सीमा बदलली जाते तेव्हाच शेजारील देशांवर परिणाम होतो, मात्र यामध्ये तसं झालेलं नाही.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*