सुशांत सिंह प्रकरणात सर्व शक्यतांचा तपास एम्सच्या अहवालानंतरच; सीबीआयचे स्पष्टीकरण

वृत्तसंस्था 

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाने एम्सच्या अहवालानंतर वेगळे वळण घेतले आहे. सुशांतची हत्या नसून आत्महत्याच असल्याचा निर्वाळा डॉक्टरांनी दिला होता. त्यामुळे माध्यमांमध्ये सुरू असलेली जोरदार चर्चा थंडावली होती. या अहवालानंतर या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयने महत्त्वाचं वक्तव्य दिलं आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सुरू असून सीबीआय सर्वच शक्यतांचा तपास अतिशय काळजीपूर्वक करत असल्याचं मत सीबीआयच्या प्रवक्त्यांनी व्यक्त केलं आहे.

याआधी सुशांत सिंहच्या कुटुबीयांकडून सीबीआयच्या तपासाबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करण्यात आली होती. सीबीआय नेमका काय तपास करत आहे हेच कळत नाही असं सुशांतच्या वडिलांचे वकील विकास सिंह यांनी म्हटलं होतं.

दरम्यान,  अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात मुंबई पोलिसांवर चौफेर टीका झाली होती. सोशल मीडियावरूनही अनेक गोष्टी सांगण्यात आल्या होत्या. त्या सगळ्यांवर मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मोठा आरोप केला आहे. मुंबई पोलिसांच्या बदनामीचं मोठं षडयंत्र रचलं गेलं असून त्याच्या पाठीमागे कोण आहेत याचा पोलीस तपास करत असल्याचं म्हटलं आहे. पोलिसांना बदनाम करण्याचे सर्व प्रयत्न हाणून पाडू असा इशाराही त्यांनी दिला.

सिंग म्हणाले, मुंबई पोलिसांची बदनामी करण्याचं षड्यंत्र रचलं गेलं. या षडयंत्रामागे कोण आहेत याचा तपास केला जात आहे. आम्ही मुंबई पोलिसांनी केलेला सर्व तपास सर्वोच्च न्यायालयाला सादर केले होता आणि ते समाधानी होते. सत्य हे कायम सत्यच असते ते सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे.

अनेक फेक अकाउंटस तयार केले गेले त्या माध्यमातून पोलिसांची बदनामी केली गेली. त्या सर्व अकाउंटसचा तपास सुरू आहे अशी माहितीही त्यांनी दिली.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*