छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादुका पंढरपुरात नेल्याप्रकरणी वारकऱ्यांवर गुन्हा दाखल

विशेष प्रतिनिधी

पंढरपूर : कोरोनाचा प्रादूर्भाव असताना कोणतीही परवानगी न घेता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादुका रायगडहून पंढरपूरला नेणाऱ्या तीन वारकऱ्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

मुख्य रस्त्यांवर परवानगी नसताना हे वारकरी सह्याद्रीच्या रांगा ओलांडून, नदीतून पोहत जाऊन पंढरपूरात पोहोचले होते.

आषाढी एकादशी निमित्त योगेश महिंद्र, संदीप महिंद्र आणि किरण घाडगे या तिघांनी रायगडहून पंढरपूरला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादुका नेल्या होत्या. त्यासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. संचारबंदी असतानाही या तिघांनी संचारबंदीच्या नियमांचे पालन केले नाही.

साथीच्या रोगांच्या फैलावासंबंधीच्या नियमांचेही त्यांनी उल्लंघन केले होते. त्यामुळे या तिघांवर कारवाई होण्याची मागणी होत होती. त्यामुळे अखेर या तिघाजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या सहा वर्षांपासून काही वारकरी रायगडहून पंढरपूरला शिवरायांच्या पादुका घेऊन जातात. पायी चालतच हे वारकरी जात असतात. यंदाही त्यांना पंढरपूरला जायचे होते. पण त्यांच्याकडे शिवरायांच्या पादुका घेऊन जाण्यासाठी परवानगी नव्हती. ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त होता. पुणे आणि रायगड मार्गावर पोलिसांच्या बॅरिकेड्स होत्या. त्यामुळे वारक-यांना पंढरपूरला जाणं शक्य नव्हतं.

त्यामुळे त्यांनी चक्क सह्याद्रीच्या पर्वत रांगावरून जाण्याचा निर्णय घेतला. तीन तासांत त्यांनी सह्याद्री पर्वत पार केला. त्यानंतर सराटी नदीतून पोहत बाहेर पडले आणि जंगलातील रस्ते तुडवत थेट पंढरपूरला पोहोचले. हा प्रवास खूप खडतर होता. पोलिसांचा ठिकठिकाणी पहारा असल्याने आम्हाला अवघड वाटेने जावे लागले असे या वारक-यांनी सांगितले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*