विशेष प्रतिनिधी
मुंबई : भाजपची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी जाहीर करताना प्रदेशाध्यक्ष चंद्रकातदादा पाटील यांनी माजी मंत्री पंकजा मुंडे यांना केंद्रीय स्तरावर भाजपची जबाबदारी देण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा केली.
महाराष्ट्र भाजपमधील सर्व कथित नाराज नेत्यांना प्रदेश कार्यकारिणीत स्थान देण्यात आल्याची घोषणाही त्यांनी केली. यात एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश मेहता आदी नेत्यांचा समावेश आहे. पंकजा मुंडे प्रदेश भाजपच्या कोअर कमिटीत असतीलच पण त्यांना केंद्रात पक्षाची मोठी जबाबदारी देण्यात येईल, असे चंद्रकातदादा पाटील यांनी स्पष्ट केले.
रक्षा खडसे आणि प्रीतम मुंडे यांना प्रदेश उपाध्यक्षपदी नेमण्यात आले आहे. राम शिंदे, संजय कुटे, माधव भंडारी यांचाही यात समावेश असेल. एकूण १२ उपाध्यक्ष, ६ सरचिटणीस, विविध मोर्चांचे अध्यक्ष, निमंत्रित सदस्य अशी ही विस्तारित कार्यकारिणी असेल. यात बाहेरून आलेल्या चित्रा वाघ, प्रसाद लाड यांनाही संधी देण्यात आली आहे.
देवयानी फरांदे यांना सरचिटणीस नेमल्याने पक्षाचे विधानसभेतील सह प्रतोदपद आमदार माधुरी मिसाळ यांना देण्यात आली आहे.