एक देश, एक बाजाराचे स्वप्न साकार होणार, मुख्तार अब्बास नक्वी यांचा विश्वास

कृषी क्षेत्रावर अवलंबून भारत देशाने शेतकरी कल्याण केंद्रित राष्ट्र होण्याच्या मार्गावर बरीच प्रगती केली असून या नव्या राष्ट्रात शेतकरी घेत असलेल्या मेहनतीसाठी त्यांना मोठा मान मिळेल आणि त्यांच्या उत्पादनांना योग्य भावही दिला जाईल, असे केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी सांगितले.


वृत्तसंस्था

मुरादाबाद : कृषी क्षेत्रावर अवलंबून असलेल्या भारत देशाने शेतकरी कल्याण केंद्रित राष्ट्र होण्याच्या मार्गावर बरीच प्रगती केली असून या नव्या राष्ट्रात शेतकरी घेत असलेल्या मेहनतीसाठी त्यांना मोठा मान मिळेल आणि त्यांच्या उत्पादनांना योग्य भावही दिला जाईल, असे केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी सागितले.

उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद भागातल्या लोधीपूर गावात शेतकरी वर्ग्गासाठी आयोजित केलेल्या किसान चौपाल या मेळाव्यात ते बोलत होते.

ते म्हणाले, उत्पन्न दुप्पट करण्याच्या केंद्र सरकारच्या निधार्रामुळे, दलाल आणि मध्यस्थांची चिंता मात्र चौपट झाली आहे. सरकारच्या कृषी सुधारणा कायद्यांनी शेतकऱ्यांच्या डोळ्यांमध्ये आनंद आणि जीवनात समृद्धी आणण्याची हमी दिली आहे. हे कायदे मध्यस्थांच्या विळख्यातून शेतकऱ्यांची मुक्तता करून त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याची खात्री देतील.


शेतकऱ्यांना समृद्धी प्रदान करण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे. त्यामुळे कृषी सुधारणा कायदे हे शेतकऱ्यांची संपन्नता आणि सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेले ऐतिहासिक पाऊल आहे.

नक्वी म्हणाले की, उत्पादनाचे विपणन आणि व्यापार प्रोत्साहन आणि सुगमीकरण कायदा, हमी भावाबाबत शेतकऱ्यांचे संरक्षण आणि सक्षमीकरण करार आणि शेती सेवांबाबत आणि आवश्यक वस्तूंबाबतच्या कायद्यात सुधारणा करणारा कायदा असे सर्व कायदे मजूर झाल्यामुळे, आता शेतकऱ्यांना त्यांचा शेतीमाल विकण्यासाठी नव्या संधी उपलब्ध होतील. त्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढेल .

शेतकऱ्यांनी त्यांचा शेतीमाल बाजारातील परवानाधारक व्यापाऱ्यांना विकणे आता अनिवार्य असणार नाही. सरकारी बाजारात भराव्या लागणाऱ्या करापासून देखील शेतकऱ्यांना आता मुक्ती मिळेल. त्यांना त्यांच्या उत्पादनांची किंमत तीन दिवसांत चुकती केली जाईल. या व्यवस्थेमधून एक देश, एक बाजार संकल्पना सत्यात येईल.

देशातील गावे, खेडी आणि शेतकरी यांच्या कल्याणाप्रती प्रधानमंत्री कटिबद्ध आहेत आणि सरकार कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या हक्कांचे रक्षण करेल अशी ग्वाही देत नक्वी म्हणाले, केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत आतापर्यंत 92 हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्त निधी शेतकऱ्यांना दिला गेला आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*