मुख्यमंत्री मातोश्रीच्या पिंजऱ्यात, राज्य चालणार कसे, नारायण राणे यांची टीका


राज्याला मुख्यमंत्रीच नाही. ज्या नेत्याकडे मुख्यमंत्रिपद आहे तो ‘मातोश्री’च्या पिंजऱ्यात बसला आहे. ‘मातोश्री’ पुरताच मुख्यमंत्री आहे. एकतर मुख्यमंत्री तिथून बाहेर येत नाहीत आणि बाहेर आलेच तर काही बोलत नाहीत. त्यामुळे हे अबोल, निष्क्रीय सरकार सत्तेत राहणे राज्याच्या हिताचे नाही, अशी घणाघाती टीका भारतीय जनता पक्षाचे नेते खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत केली.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्याला मुख्यमंत्रीच नाहीत. ज्या नेत्याकडे मुख्यमंत्रिपद आहे तो ‘मातोश्री’च्या पिंजऱ्यात बसला आहे. ‘मातोश्री’पुरताच मुख्यमंत्री आहे. एकतर मुख्यमंत्री तिथून बाहेर येत नाहीत आणि बाहेर आलेच तर काही बोलत नाहीत. त्यामुळे हे अबोल, निष्क्रीय सरकार सत्तेत राहणे राज्याच्या हिताचे नाही, अशी घणाघाती टीका भारतीय जनता पक्षाचे नेते खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत केली.

भाजप कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत राणे बोलत होते. भाजपचे राज्याचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, आमदार नितेश राणे, राज पुरोहित उपस्थित होते. राणे यांनी यावेळी मु्ख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली.

ते म्हणाले, चीनी व्हायरसचा उद्रेक प्रचंड वाढला आहे. स्थिती हाताबाहेर गेली आहे. मुंबईत ५ हजारावर तर राज्यात ८ हजारावर बळी गेले आहेत. तरीही सरकार जराही गंभीर नाही. मंत्रालयात गेल्या काही महिन्यांपासून मुख्यमंत्रीच बसत नाही. सगळा कारभार मातोश्री या निवासस्थानातून चालवला जातो. हे असंच चालणार असेल तर ज्या सचिवालयाचं नाव बदलून मंत्रालय असं केलं होतं ते नाव आता पुन्हा एकदा सचिवालय करावं लागेल.

राणे म्हणाले, मुख्यमंत्री डोळे मिटून लॉकडाऊन करत सुटले आहेत. मागचा पुढचा कोणताही विचार केला जात नाही. लॉकडाऊन करायला हवं पण कुठपर्यंत तेही ठरवायला हवं. लॉकडाऊन वाढत असताना प्रत्येक महिन्यात नवे प्रश्न उभे राहत आहेत. रुग्णही कमी होत नाहीत. लोकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. उद्योगधंदे बंद पडले आहेत. मुंबईत बांधकाम व्यवसाय ठप्प झाला आहे. बोगस बियाणे देऊन शेतकऱ्यांना फसविले जात आहे.

कोकणातील चक्रीवादळग्रस्तांना मदतीचा एक रुपयाही अद्याप मिळालेला नाही. पंचनामेही केले गेलेले नाहीत. राज्यातील सर्व घटक अडचणीत आहेत. त्याचे कारण हे सरकार असून ते लवकरात लवकर जायला पाहिजे. राज्यात राष्ट्रपती राजवट आणावी हे आपले वैयक्तिक मत असून त्यावर आपण ठाम असल्याचे सांगत राणे म्हणाले, मुख्यमंत्र्यांचा प्रशासनावर कोणताही अंकुश दिसत नाही. परस्पर बदल्या होतात, रद्दही केल्या जातात. अशा प्रकारे राज्य कसे चालेल.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था