मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा, अन्यथा भाजपाचे आंदोलन, प्रवीण दरेकर यांचा इशारा

अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकरी अडचणीत आला आहे. मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा. बागायती जमिनीसाठी 50 हजार आणि कोरडवाहू जमिनीसाठी 25 हजार हेक्टरी मदत द्या, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.


विशेष प्रतिनिधी

औरंगाबाद : अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकरी अडचणीत आला आहे. मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. अन्यथा भारतीय जनता पक्षातर्फे टोकाचा संघर्ष करण्याचा निर्णय घेऊन आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

प्रवीण दरेकर यांनी नुकताच मराठवाड्याचा दौरा केला. फुलंब्री, खुलताबाद, औरंगाबाद, कन्नड या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी तेथील परिस्थितीची पाहणी केली. मराठवाड्यातील काही भागात अतिवृष्टीने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सोयाबीन, कापूस, मुग पिकांना मोठा तडाखा बसल्याने सर्वसामान्य शेतकरी अक्षरश: हतबल झाले.

या स्थितीत राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा अन्यथा सर्वसामान्य शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. सरसकट पंचनामे करा, अशी मागणी दरेकर यांनी केली. ते म्हणाले, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यांची परिस्थिती गंभीर आहे. पण या सरकारच शेतकऱ्यांकडे लक्ष नाही. किंबहुना हे सरकार शेतकऱ्यांना गांभीर्याने घेत नाही. सरकारकडून फक्त पत्रव्यवहार सुरू आहे.

शासनाची पूर्ण ताकद वापरून तातडीने पंचनामे पूर्ण करा. तसंच पीक विम्याचे क्लेम तातडीने मंजूर करा. जर शेतकऱ्यांना मदत केली गेली नाही तर भारतीय जनता पार्टी शेतकऱ्यांना सोबत घेऊन टोकाचा संघर्ष करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

प्रवीण दरेकर म्हणाले, मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा. त्याचबरोबर बागायती जमिनीसाठी 50 हजार आणि कोरडवाहू जमिनीसाठी 25 हजार हेक्टरी मदत द्या. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यांची परिस्थिती गंभीर आहे पण या सरकारचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*