ममतांच्या पायाखालची वाळू सरकली; तृणमूळच्या नेत्यांचा तोल सुटला

  •  निर्मला सीतारामन म्हणजे विषारी नागीण; तृणमूळच्या खासदाराची आक्षेपार्ह टीका
  •  खा. कल्याण बॅनर्जी यांच्या वक्तव्यानंतर पश्चिम बंगालमधील भाजप नेतेही आक्रमक

वृत्तसंस्था

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली असताना मुख्यमंत्री ममता बँनर्जी यांच्या पायाखालची वाळू घसरू लागली. तृणमूळ काँग्रेसच्या नेत्यांचा तोल सुटला आणि त्यांचा खासदारानेच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची तुलना विषारी नागिणीशी करून टाकली.

सीतारामन या विषारी नागीण असल्याची विखारी टीका तृणमूळ काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी केली. ते पश्चिम बंगालच्या बंकुरा येथे पेट्रोल दरवाढीविरोधात करण्यात आलेल्या आंदोलनावेळी बोलत होते. ते म्हणाले, “एखाद्या विषारी नागिणीच्या दंशाने माणसाचा मृत्यू होतो, त्याचप्रमाणे निर्मला सीतारामन यांच्यामुळे देशातील लोक मरत आहेत. निर्मला सीतारामन यांनी देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली. सध्याच्या घडीला निर्मला सीतारामन या जगातील सर्वात वाईट अर्थमंत्री अाहेत.”

खा. कल्याण बॅनर्जी यांच्या या वक्तव्यानंतर पश्चिम बंगालमधील भाजप नेतेही आक्रमक झाले आहेत. ममता बॅनर्जी यांची पक्षावरची पकड सुटली आहे. त्यामुळे पक्षाचे नेते नैराश्याच्या भरात काहीही बरळत असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी केली. तृणमूळ काँग्रेस पक्षात वरपासून खालपर्यंत भ्रष्टाचार पसरला आहे. पक्षातील अंतर्गत वादांमुळे अनेक नेते भरकटले आहेत. त्यामुळे लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी हे नेते निरर्थक बरळत असल्याचेही दिलीप घोष यांनी म्हटले.

यापूर्वी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मजूर आणि कामगारांना थेट न मदत दिल्याच्या मुद्द्यावरून काँग्रेसने निर्मला सीतारामन यांना लक्ष्य केले होते. निर्मला सीतारामन यांना ही आव्हानात्मक परिस्थिती सांभाळता येत नाही. त्यामुळे मोदी सरकारने वेळ पडल्यास विरोधी पक्षातील अर्थतज्ज्ञांची मदत घ्यावी, असा सल्ला काँग्रेसकडून देण्यात आला होता.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*