कोरोना संकटकाळातील भाजपचे सेवाकार्य अविरत सुरू राहील; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विश्वास

  • संकटकाळातच लाखो, करोडो भाजप कार्यकर्ते तावून सुलाखून निघाले; जनतेचे आशीर्वाद आपणाला लाभले

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : “जग जेव्हा स्वत:च्या बचावात गुंतले होते त्यावेळी भाजपच्या लाखो, कोट्यवधी कार्यकर्त्यांनी आपला जीव धोक्यात घालून कार्य केले. कोरोना संकटकाळात सुरू झालेला हे सेवाकार्य थांबता कामा नये. ते अविरत सुरू राहिले पाहिजे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील भाजप कार्यकर्त्यांना केले.

कोरोना संकटकाळात भाजपने घेतलेल्या सेवायुग उपक्रमाचा आढावा घेणारी देशव्यापी बैठकीला ते संबोधित करत होते. राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, पूर्वाध्यक्ष राजनाथ सिंह, अमित शहा, सर्व केंद्रीय मंत्री, सर्व प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री लाखो कार्यकर्ते या virtual बैठकीत उपस्थित होते.

महाराष्ट्र, राजस्थान, कर्नाटक, बिहार, दिल्ली, आसाम आणि उत्तर प्रदेश या सात राज्यांच्या सेवाकार्यांचे प्रेझेंटेशन यावेळी करण्यात आले. मोदींनी या सर्वांच्या मातृभाषेत शुभेच्छा दिल्या.

यानंतर बोलताना मोदी म्हणाले, “जनसंघ आणि भाजपच्या स्थापनेचा मूळ उद्देश्य सेवाभाव हा आहे. सत्ता हे सेवाभावाचे माध्यम मानले आहे. सत्ता आपल्यासाठी स्वार्थाचे साधन नाही. याच सेवाभावातून भाजप कार्यकर्त्यांनी दीर्घकाळासाठी काम केले. ज्यांची जेवढी क्षमता होती, त्यापेक्षाही अधिक काम कार्यकर्त्यांनी केले आहे. कोरोना संकटात भाजप कार्यकर्त्यांनी स्वत:चीच अग्नीपरीक्षा घेतली. कसोटीच्या काळात तावून सुलाखून निघाले. एक कार्यकर्त्याच्या रूपात मला याचा अधिक आनंद होतो. जनसंघाच्या आपल्या पूर्वज कार्यकर्त्यांनी ही प्रेरणा आमच्यात निर्माण केली.”

राजकीय पक्षांचे परीक्षण निवडणुकीच्या कसोटीवर होते. भाजपचे संघटन केवळ निवडणूक जिंकण्याचे मशीन नाही. ते सेवा संघटन आहे. राष्ट्र प्रथम ही आमची भावना आहे. श्यामा प्रसाद मुखर्जी, दीनदयाळ उपाध्याय यांनी सेवाभावाची प्रेरणा आमच्यात विकसित केली, असे सांगून मोदी म्हणाले, “सगळा समाज आता भाजपशी जोडला आहे. आज पक्षाचे ५२ दलित खासदार , ४३ आदिवासी खासदार, ११३ ओबीसी खासदार भाजपचे आहेत. शेकडो आमदार पक्षाने दिले आहेत. सेवाभावातूनच करोडो कार्यकर्त्यांनी समाज जोडला आहे.

या तीन महिन्यांत जनता जनार्दनाचा कधी नव्हे एवढा आशीर्वाद दिला. समाजाने स्नेह दिला, मदतही केली आहे. या शक्तीला आपण ओळखून पुढेही कार्य कराल, असा मला विश्वास वाटतो.”

सरकारच्या विविध योजना कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत पोचवल्या आहेत. जनतेच्या स्वप्नांना आपले मानून पुढे जाणे आवश्यक आहे. सात “स”कार घेऊन पुढे गेले पाहिजे. आपला सेवायग्य थांबता कामा नये.

सत्ताधारी पक्षांच्या कार्यकर्त्यांकडे मागण्या, तक्रारी करतात. हे देखील कार्यकर्त्यांनी समजावून घेतले पाहिजे. ही समाजाने आपल्याला सेवेची संधी दिली आहे.
सर्व कार्यकर्त्यांनी एवढे मोठे सेवा कार्य केले. प्रत्येक मंडलाची डिजिटल बुक बनवा. जिल्हा, राज्य देशाचे डिजिटल बुक बनवा. २५ सप्टेंबर दीनदयाळ जयंती निमित्त प्रकाशित करावा. हे सेवा कार्य मानवी इतिहासात सर्वांत मोठे सेवा कार्य होते. सगळे जग याकडे मोठे उदाहरण म्हणून पाहणार आहे, असे आवाहन मोदींनी केले.

कर्नाटकात स्मशानातल्या सेवकांना मोदी किट देण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. सर्व प्रदेशांनी सेवाकार्याचे असे अनुभव सांगितले.

दिल्लीतील भटक्या विमुक्त जमातीतल्या सपेरा समूदायाला वस्तीत जाऊन मोदी किट दिले. या समूदायाने पूंगी वाजवून मोदींना आशीर्वाद दिल्याची अनमोल आठवण दिल्ली प्रदेशाने सांगितली.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*