जातीय राजकारण पेटविण्याचा कॉंग्रेसचा डाव, दलित मतांवर डोळा

उत्तर प्रदेशातील हाथरस बलात्कार प्रकरणावरून जातीय राजकारण पेटविण्याचा डाव कॉंग्रेसने आखला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दूर गेलेला दलित मतदार आपल्या बाजूला वळविण्यासाठी कॉंग्रेस प्रयत्न करत आहे.


वृत्तसंस्था

लखनऊ : उत्तर प्रदेशातील हाथरस बलात्कार प्रकरणावरून जातीय राजकारण पेटविण्याचा डाव कॉंग्रेसने आखला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दूर गेलेला दलित मतदार आपल्या बाजुला वळविण्यासाठी कॉंग्रेस प्रयत्न करत आहे.

उत्तर प्रदेशातील राजकारणात कॉंग्रेस अनेक वर्षांपासून उखडली गेली आहे. याचे कारण म्हणजे दलित मतदार त्यांच्यापासून दूर गेला. उत्तर प्रदेशातील आपला गमावलेला जनाधार पुन्हा मिळवणे आणि पक्षाला मजबूत बनवणे यासाठी जोरदार प्रयत्न करताना दिसत आहे.

उत्तर प्रदेशातील राजकारणात दलित समाज २१ टक्के आहे. मात्र, तो मोठ्या प्रमाणात विभाजित आहे. सर्वात मोठ्या संख्येने असलेला जाटव समाज हा बहुजन समाज पक्षाच्या मागे होता. त्यातील मोठा भाग २०१४ पासून भारतीय जनता पक्षाच्या बाजुला आला आहे. त्यानंतरचा दुसऱ्या संख्येने असलेला वाल्मिकी समाज आहे. हाथरसमधील पीडिता याच समाजाची आहे. उत्तर प्रदेशातील वाल्मिकी समाज ८० च्या दशकामध्ये काँग्रेसच्या सोबत होता. त्यानंतर तो बहुजन समाज पक्षाकडे वळत आता भारतीय जनता पक्षाचा समर्थक बनला आहे. आता दलितांमध्ये आपले स्थान मजबूत बनवण्यासाठी कॉंग्रेस सक्रिय झालेला आहे. त्यासाठीच या घटनेचे भांडवल केले जात आहे.

उत्तर प्रदेशातील निवडणुकीत जातीचा प्रभाव नेहमीच राहिला आहे. कॉंग्रेसने तर नेहमीच जातीची गणिते मांडूनच प्रचार केला. मात्र, २०१४ नंतर उत्तर प्रदेशातील राजकारणात बदल झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यावेळचे उत्तर प्रदेशचे भारतीय जनता पक्षाचे प्रभारी अमित शहा यांनी जातीच्या भिंती तोडून मतदारांना एकत्र आणले. त्यामुळे भाजपाच्या मतांचे प्रमाण ४० टक्यांच्या वर गेले. कोणत्याही एका जातीसमुहाला सोबत ठेऊन इतकी मते मिळविता येत नाही. गेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने नरेंद्र मोदींच्या नावावर निवडणूक लढविली. भाजपने त्या जोरावर ८० पैकी तब्बल ७१ जागा जिंकल्या आणि केंद्रात स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवले.

तेव्हापासूनच कॉंग्रेसने पुन्हा एकदा जातीय प्रचाराचा वणवा पेटविण्याची रणनिती आखली. उत्तर प्रदेशात जातीचे गणित जो जमवतो तो विजयी होतो असे म्हटले जाते. हेच गणित जमविण्याचा कॉंग्रेसचा प्रयत्न आहे. गेल्या निवडणुकीत अनुसूचित जमाती, बिगर जाटव दलित, जाट, इतर मागासवर्गीय आणि उच्चवर्णीय भाजपच्या पाठीशी असल्याचे आढळले आहे. एकूण ७२ टक्के ओबीसी आणि ७४ टक्के उच्चवर्णीयांनी भाजपला पाठिंबा दिला. याखेरीज ६१ टक्के अनुसूचित जमाती, ५७ टक्के बिगर जाटव दलित आणि ५५ टक्के जाट समाजाने भाजपला पाठिंबा दिला होता. हे सगळे गणित कॉंग्रेसला मोडायचे आहे. त्यासाठीच हाथरस घटनेमध्ये जातीय राजकारणाची बिजे कॉंग्रेसकडून शोधली जात आहेत.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*