कॉंग्रेसच्या सरचिटणिस प्रियंका वड्रा यांनी शासकीय बंगला रिकामा केल्यावर तो भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते अनिल बलुनी यांना दिला जाणार आहे. नगरविकास मंत्रालयाने याबाबतचे आदेश काढले आहेत.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कॉंग्रेसच्या सरचिटणिस प्रियंका वड्रा यांनी शासकीय बंगला रिकामा केल्यावर तो भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते अनिल बलुनी यांना दिला जाणार आहे. नगरविकास मंत्रालयाने याबाबतचे आदेश काढले आहेत.
प्रियंका वड्रा यांना त्यांचे दिल्लीतील शासकीय निवासस्थान एका महिन्यात रिकामे करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. प्रियंका गांधी यांना एसपीजी सुरक्षा असल्यामुळे 1997 सालापासून हे शासकीय निवासस्थान देण्यात आलं होतं.
2019 मध्ये केंद्र सरकारने देशातील व्हीआयपींच्या सुरक्षेवरील खर्च कमी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी संपूर्ण गांधी कुटुंबीयांची एसपीजी सुरक्षा काढून घेतली आहे. वेळोवेळी गुप्तचर यंत्रणांचे सुरक्षा अहवाल येतात त्यानुसार आता गांधी कुटुंबाला एसपीजी सुरक्षेची गरज नसल्याचा अहवाल आला होता. सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे दोघेही लोकसभेचे खासदार असल्याने त्यांचे शासकीय निवासस्थान दिल्लीत आहे.
पण प्रियांका गांधी यांना मात्र एसपीजी सुरक्षा असल्याने मिळालेलं शासकीय निवासस्थान आता ठेवता येणार नाही. त्यांनी 35 लोधी ईस्टेट हे त्यांचं शासकीय निवासस्थान पुढच्या एक महिन्यात रिकामं करावं, अशी नोटीस केंद्रीय गृहनिर्माण आणि नगर विकास खात्याने बजावली आहे. यापेक्षा अधिक काळ या शासकीय निवासस्थानाचा लाभ घेतल्यास त्याबद्दल त्यांना दंड भरावा लागेल, असेही नोटीशीत म्हटले आहे.
त्यामुळे आता 35, लोधी एस्टेट बंगला भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते अनिल बलुनी यांना मिळणार आहे. बलुनी हे भाजपाचे प्रमुख प्रवक्ते आहेत. २०१९ च्या निवडणुकांत भाजपाचे माध्यम प्रमुख म्हणून त्यांनी काम केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृह मंत्री अमित शहा यांचे विश्वासू म्हणून ते ओळखले जातात.