130 कोटींच्या भारताची चिनी विषाणूविरुद्धची लढाई कौतुकास्पद

  • जागतिक आरोग्य संघटनेने केली भारताची प्रशंसा

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : अवाढव्य लोकसंख्या आणि आकारमान असूनही चिनी विषाणूचा प्रसार रोखण्यात चांगले यश मिळवल्याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) भारत सरकारची प्रशंसा केली आहे. जगातील इतर अनेक प्रगत आणि श्रीमंत देशांच्या तुलनेत भारताने चालवलेली लढाई कौतुकास्पद असल्याचे डब्ल्यूएचओला वाटते. मात्र कोरोना रुग्णांची संख्येच्या डाटा व्यवस्थापनावरही भारत सरकारने अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले आहे.

भारताची लोकसंख्या हे सर्वात मोठे आव्हान आहे. भारतातील हवामान आणि भौगोलिक भिन्नता, वैविध्य लक्षात घेता प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या रोगांच्या साथी एकाचवेळी चालू असतात. अशावेळी चिनी विषाणूविरुद्धचा लढा सोपा नाही. या आव्हानात्मक स्थितीतही भारताला कणखर राजकीय नेतृत्त्व लाभले असल्याने महत्वाच्या विषयांवर सरकारने लक्ष केंद्रीत केल्याचे दिसते. चाचण्यांची संख्या वाढवणे, उपचाराच्या सोयीसुविधा निर्माण करुन देणे, लॉकडाऊनसारख्या प्रतिबंधात्मक उपायांची अंमलबजावणी करणे यात राजकीय नेतृत्वाचे यश दिसते, असे डब्ल्यूएचओने म्हटले आहे. चिनी विषाणूची जागतिक साथ आता भारतात पुढच्या टप्यात पोहोचत असताना दूरगामी उपाययोजनांची गरज भासणार आहे. त्यावर आता नेतृत्वाने लक्ष द्यावे, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.

डब्ल्यूएचओच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या खास मुलाखतीत सांगितले, “चिनी विषाणूचा उद्रेक झाल्यानंतर त्याचे गांभीर्य ओळखत भारत सरकारने तातडीने पावले उचलली. जानेवारी महिन्यातच भारताने डब्ल्यूएचओने सुचवलेल्या उपायांनुसार काम सुरु केले. आता भारतात दररोज  2 लाखांपेक्षा जास्त चाचण्या रोज होतात. आता भारत टेस्टिंग कीट्स विकसित करत आहे. अवघ्या काही महिन्यात भारत टेस्टिंग कीट्सच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला आणि यांचे उत्पादन वाढवण्याची क्षमता भारताने निर्माण केली हे फार मोठे यश मानावे लागेल.”

आता भारताने डाटावर लक्ष द्यावे. म्हणजेच उपलब्ध होणाऱ्या डाटाचा नियोजनपूर्वक उपयोग करण्यास सुरुवात करावी, असे मला सुचवायचे आहे, असे डॉ. स्वामीनाथन यांनी स्पष्ट केले. कारण कोरोना रुग्णांची एकूण संख्या आणि एकूण कोरोना मृत्यू या दोनच आकड्यांवर लक्ष दिले तर आपल्याला अर्धवटच गोष्ट समजते, असे स्पष्ट करुन डॉ. स्वामीनाथन म्हणाल्या, “कोरोना रुग्णांबद्दलची माहिती कशी सादर करायची याबद्दल राष्ट्रीय स्तरावरुन नियमावली तयार करण्याची गरज आहे. त्या शिवाय तुलना करता येणार नाही.

प्रत्येक राज्य वेगवेगळ्या पद्धतीने माहिती सादर करतो. या संदर्भात डब्ल्यूएचओने काही निश्चित नियमावली तयार केली आहे.” सर्वात प्रथम आपल्याला हे समजले पाहिजे की, दर दहा लाख लोकांमागे किती कोरोना रुग्ण आहेत आणि ते कोणत्या भागात आहेत. फक्त कोरोना रुग्णांची नोंद करुन उपयोग नाही. किती चाचण्या झाल्या तेही सांगितले पाहिजे. महत्वाचे म्हणजे कोरोना पॉझिटिव्ह येण्याचा दरही समजला पाहिजे. हा दर पाच टक्क्यांपेक्षा कमी असला पाहिजे. यानंतर आपण रुग्णवाढीचा म्हणजे रुग्ण दुप्पट होण्यास किती वेळ लागला यावर लक्ष द्यायला हवे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

चिनी विषाणूची बाधा झाल्यांतर 48 ते 72 तासात संबंधित व्यक्तीची चाचणी व्हायला हवी तरच त्याचा उपयोग आहे. चिनी विषाणूची लागण झाल्यानंतर दहा दिवसांनी त्याचा तपास लागला तर तोपर्यंत फार उशीर झालेला असतो. त्यामुळे रुग्णांचा माग काढणे (ट्रेसिंग) फार महत्वाचे आहे. यामुळे कोरोनाचा फैलाव रोखण्यास मदत होईल, असे डॉ. स्वामिनाथन म्हणाल्या.

राज्यांनी एकमेकांना मदत केली पाहिजे, असे डॉ. स्वामिनाथन म्हणाल्या. त्यांनी सांगितले की, या बाबतीत युरोपचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवता येईल. फ्रान्समधल्या रुग्णालयांमध्ये खाटांची उणीव भासू लागल्यानंतर त्यांनी फ्रेंच रुग्ण जर्मनीतल्या रुग्णालयांमध्ये पाठवले. कोविड-19 म्हणजेच चीनी विषाणूची साथ जगात दीर्घकाळ राहणार आहे. ती लवकर आटोक्यात येणारी नाही. त्यामुळे सर्व बाजूंनी विचार करावा लागणार आहे.

रुग्णालयांनी केवळ चीनी विषाणूच्या उपचारांवर लक्ष केंद्रीत करुन उपयोगी नाही, याकडेही डॉ. स्वामीनाथन यांनी लक्ष वेधले. त्या म्हणाल्या की, आपल्या देशात आरोग्यविषयक इतरही अनेक समस्या आहेत. टीबी, लशींनी बरे होणारे इतर आजार, महत्वाच्या शस्त्रक्रिया याकडे दुर्लक्ष झाले तर ते चीनी विषाणूपेक्षा घातक ठरेल. त्यामुळे रुग्णालयांची क्षमता वाढवावी लागेल आणि अन्य आजार, शस्त्रक्रिया यावरही लक्ष द्यावे लागले. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार चार जुलैपर्यंत देशात 6 लाख 48 हजार 315 कन्फर्मड् रुग्ण सापडले असून 18 हजार 655 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*