१९९३ मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी युसुफ मेमनचा हृदयविकाराने मृत्यू

विशेष प्रतिनिधी

नाशिक : मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या १९९३ मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपींपैकी एक  युसुफ अब्दुल रज्जाक मेमनचा शुक्रवारी (दि.२६) दुपारी जिल्हा शासकीय रूग्णालयात मृत्यू झाला. तो ५४ वर्षांचा होता.

२०१८ सालापासून मेमन नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात आजीवन कारावासाची शिक्षा भोगत होता. युसुफच्या मृतदेहाचे शवविच्छेदन धुळे येथील शासकिय महाविद्यालयात केले जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

कारागृह प्रशासनाने सांगितले की, मुंबईत १९९३ साली झालेल्या बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी तथा इब्राहीम मुश्ताक मेमन उर्फ टायगर मेमन आणि याकुब मेमनचा भाऊ असलेला युसुफ मेमनदेखील या बॉम्बस्फोटात दोषी आढळून आला होता. औरंगाबाद कारागृहातून युसुफला २०१८ साली नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यात आले होते. मागील दोन वर्षांपासून तो या कारागृहात शिक्षा भोगत होता.

शुक्रवारी सकाळी कारागृहात युसुफला श्वासोच्छवासाकरिता त्रास होऊ लागल्याचे निदर्शनास आले. त्याला तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले; मात्र उपचारादरम्यान युसुफला मयत घोषित केले. कारागृह अधिक्षक प्रमोद वाघ यांनी ही माहिती दिली.

हृदयविकाराच्या झटक्याने युसुफचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी सांगितले जात आहे. युसुफ हा औरंगाबाद कारागृहात येण्यापुर्वी मुंबईच्या आर्थररोड कारागृहात शिक्षा भोगत होता. दाऊद टोळीशी संबंधित युसुफला १९९३च्या बॉम्बस्फोटप्रकरणी अटक करण्यात आली होती. दहशतवादी कृत्य घडवून आणल्याचा ठपका याकुब, युसुफ मेमनवर न्यायालयाने ठेवला होता. टायगरचा धाकटा तर युसुफचा मोठा भाऊ याकुबला २०१५ साली नागपूरमधील तुरूंगात फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*