हिंदीवरून आगडोंब पेटविण्याचा पी. चिदंबरम यांचा डाव, केंद्रीय सुरक्षा दलांना केले लक्ष्य

देशातील वातावरण बिघडविण्यासाठी संधीची वाट माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम पाहत आहेत. त्यामुळेच हिंदीवरून दक्षिण भारतात पुन्हा आगडोंब पेटविण्याचा डाव चिदंबरम यांनी आखला आहे.


विशेष प्रतिनिधी

चेन्नई : देशातील वातावरण बिघडविण्यासाठी संधीची वाट माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम पाहत आहेत. त्यामुळेच हिंदीवरून दक्षिण भारतात पुन्हा आगडोंब पेटविण्याचा डाव चिदंबरम यांनी आखला आहे.

देशातील नवीन शैक्षणिक धोरण जाहीर झाल्यापासून दक्षिण भारतातील वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने हिंदीविरोधाचे अस्त्र वापरले जात आहे. सीआयएसएफच्या एका महिला अधिकाऱ्याने हिंदी येत नसल्याने माझ्या राष्ट्रीयत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते असे द्रमुकच्या खासदार कनिमोळी यांनी म्हटले होते.

चेन्नई विमानतळावरील घटना सांगताना कनिमोळी म्हणाल्या होत्या की, विमानतळावर एका सीआयएसएफ अधिकाऱ्याला मी तामिळ किंवा इंग्रजीतून बोलण्यास सांगितल्यानंतर त्या अधिकाऱ्याने मला विचारले की, मी भारतीय आहे का? कारण मला हिंदी येत नाही. मला जाणून घ्यायचं की हिंदी येणं हे भारतीयत्वाच्या समान आहे का?

या वादात आता चिदंबरम यांनी उडी घेतली आहे. त्यांनी याबाबत केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, द्रमुकच्या नेत्यांबाबत जे घडलंय हे नेहमीच घडत आलं आहे. मी सुद्धा अशा शेरेबाजीला बळी पडलो आहे. फोनवरील संवादादरम्यान आणि काहीवेळा प्रत्यक्ष समोरासमोर संभाषण करीत असताना सरकारी अधिकारी आणि काही सामान्य लोकांकडून मला हिंदीत बोलण्याचा आग्रह करण्यात आला होता.

जर केंद्राला खरेच हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषा भारताच्या अधिकृत भाषा म्हणून ठेवायच्या असतील तर त्यांनी सर्व केंद्रीय संस्था आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना दोन्ही भाषांमध्ये संवाद साधण्याच्या सूचना द्यायला हव्यात. केंद्र सरकारच्या पदांवर कार्यरत असलेले आणि हिंदी येत नसलेले कर्मचारी लवकर हिंदी बोलायला शिकतात.

दरम्यान कोणत्याही विशिष्ट भाषेचा आग्रह धरणं हे सीआयएसएफचे धोरण नाही, असे सीआयएसएफनं ट्विट करून म्हटलं आहे.
तामीळनाडूतील राजकारण हिंदीविरोधात पेटविण्याची जुनी चाल येथील राजकारणी खेळत असतात. चिदंबरम यांच्याच कॉंग्रेस पक्षातील माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनाही हिंदीवरून विरोध करण्यात आला होत. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध करण्यासाठी हिंदीविरोधी वातावरण पेटविण्याचा प्रयत्न होत आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*