बालाकोट सर्जीकल स्ट्राईकच्या वेळी भारताला कमतरता जाणवलेली अवॅक्स (एअरबॉर्न वॉर्निंग अॅण्ड कंट्रोल सिस्टिम्स) वायुसेनेला मिळणार आहे. त्यामुळे शत्रुचे हवाई हल्ले रोखता येणार आहेत.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : बालाकोट सर्जीकल स्ट्राईकच्या वेळी भारताला कमतरता जाणवलेली अवॅक्स (एअरबॉर्न वॉर्निंग अॅण्ड कंट्रोल सिस्टिम्स) वायुसेनेला मिळणार आहे. त्यामुळे शत्रुचे हवाईहल्ले रोखता येणार आहेत.
चीनसोबत सुरू असलेल्या सीमावादाच्या पार्श्वभूमीवर इस्रायल बनावटीच्या दोन फाल्कन एअरबॉर्न वॉर्निंग अॅण्ड कंट्रोल सिस्टिम्स (अॅवॅक्स) खरेदी करण्याच्या प्रस्तावास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंजुरी दिली आहे.
अॅवॅक्स ही एक रडार यंत्रणा असून, हवाई युद्धात ती अत्यंत आवश्यक आहे. भारताकडे आधीच्या तीन फाल्कन अॅवॅक्स आहेत. त्यांची टेहळणी क्षमता ३६0 अंशाची आहे. याशिवाय डीआरडीओने निर्माण केलेल्या दोन अॅवॅक्सही भारताकडे आहेत. त्यांची टेहळणी क्षमता मात्र २४0 अंशांचीच आहे. याबाबतीत चीन आणि पाकिस्तान भारताच्या खूपच पुढे आहेत. चीनकडे २८; तर पाकिस्तानकडे ७ अॅवॅक्स यंत्रणा आहेत.
फाल्कन रडारची किंमत १ अब्ज डॉलर असून, आणखी १ अब्ज डॉलर तिच्या प्लॅटफॉर्मसाठी लागतात. रशियन ए-५0 विमान या रडारसाठी प्लॅटफॉर्म म्हणून वापरले जाते. रडार आणि प्लॅटफॉर्म यांची जोडणी इस्रायलमध्ये होईल. संपूर्ण यंत्रणा मिळण्यास दोन ते तीन वर्षे लागतील. आपल्या हवाई हद्दीत हल्ला होऊ नये, यासाठी पाकिस्तानकडून स्विडिश बनावटीच्या दोन अॅवॅक्स यंत्रणा २४ तास कार्यरत ठेवल्या जात होत्या. भारतीय हवाई दलास मात्र ते शक्य नव्हते. २६ फेब्रुवारी रोजीच्या बालाकोट हवाई हल्ल्याच्या वेळी भारतीय हवाई दलास अॅवॅक्स यंत्रणेची गरज प्रकर्षाने जाणवली.