स्वातंत्र्यदिनी तृणमूल काँग्रेसचा हिंसाचार , दगडफेकीत भाजपा कार्यकर्त्याचा खून

संपूर्ण देश स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना पश्चिम बंगालमध्ये तृणमूल कॉंग्रेसने हिंसाचाराने त्याला गालबोट लावले. हुगळी ग्रामीण परिसरातील खानाकूलमध्ये शनिवारी एकाच ठिकाणी ध्वजवंदन करण्याच्या वादातून तृणमूल कॉंग्रेसच्या गुंडांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचा खून केला.


विशेष प्रतिनिधी

पुणे : संपूर्ण देश स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना पश्चिम बंगालमध्ये तृणमूल कॉंग्रेसने हिंसाचाराने त्याला गालबोट लावले. हुगळी ग्रामीण परिसरातील खानाकूलमध्ये शनिवारी एकाच ठिकाणी ध्वजवंदन करण्याच्या वादातून तृणमूल कॉंग्रेसच्या गुंडांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचा खून केला.

सुदर्शन प्रामाणिक (४०) असे त्याचे नाव असून तो भाजपचा कार्यकर्ता आहे. प्रामाणिक याच्या मृत्यूच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. तृणमूल कार्यकर्त्यांनी ही हत्या केल्याचा भाजपचा आरोप आहे. या घटनेनंतर दिवसभर या भागात तणावपूर्ण स्थिती होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही गटांच्या लोकांना ध्वजवंदनासाठी एकच जागा पाहिजे होती. त्यावरून वाद निर्माण झाला. याप्रकरणी चौकशी सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक तथागत बसू यांनी सांगितले.

प्रामाणिक यांच्या मृत्यूनंतर भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनादरम्यान काही पक्ष कार्यालयांची नासधूस करण्यात आली. आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी भाजपने १२ तासांचा बंद पुकारला आहे. पोलिसांनी चौकशीसाठी आठ जणांना ताब्यात घेतले आहे. परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भाजपचे राष्ट्रीय सचिव राहुल सिन्हा म्हणाले की, ते (तृणमूल) आम्हाला या प्रकारे रोखू शकणार नाहीत. तृणमूल काँग्रेसने मात्र हा प्रकार भाजपमधील अंतर्गत वादातून घडल्याचा दावा केला आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*