सृष्टी सुरक्षित होण्याने मानवही सुरक्षित होईल, सरसंघचालकांचे विचार

प्रकृतीवर विजय मिळवायचा नाही. प्रकृतीपासून पोषण करीत असताना प्रकृतीचे अस्तित्वही टिकवायचे आहे. सृष्टी सुरक्षित होण्याने मानव सुरक्षित होईलच, पण एकंदरीतच जीवन सुंदर होईल, असे विचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले.


विशेष प्रतिनिधी

नागपूर : प्रकृतीवर विजय मिळवायचा नाही. प्रकृतीपासून पोषण करीत असताना प्रकृतीचे अस्तित्वही टिकवायचे आहे. सृष्टी सुरक्षित होण्याने मानव सुरक्षित होईलच, पण एकंदरीतच जीवन सुंदर होईल, असे विचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पर्यावरण गतिविधी विभाग आणि हिंदू अध्यात्मिक सेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण दिनानिमित्ताने प्रकृती वंदन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नवी दिल्लीत झालेल्या या कार्यक्रमात डॉ. भागवत यांनी नागपूर येथून मार्गदर्शन केले.

ते म्हणाले की, हा दिवस साजरा करताना संपूर्ण सृष्टीच्या पोषणासाठी, आपले जीवन सौंदर्यपूर्ण बनविण्यासाठी, सर्वांंच्या उन्नतीसाठी आम्ही कार्य करीत आहोत, असा भाव आम्हाला आमच्या मनात ठेवायला हवा. शरीर हे अवयवांच्या कार्यावर, तर अंग हे शरीरातून मिळणाऱ्या प्राणिक ऊर्जेवर अवलंबून आहे. असा परस्पर संबंध सृष्टीचाही आमच्याशी आहे. आम्ही सृष्टीचे अंग आहोत. सृष्टीचे पोषण करणे हे आमचे कर्तव्य आहे. आमच्या प्राणधारणेसाठी आम्ही सृष्टीकडून काही घेतो. आम्ही सृष्टीचे शोषण करीत नाही तर दोहन करतो. ही जीवन जगण्याची पद्धती आमच्या पूर्वजांनी लक्षात घेतली.

केवळ एका दिवसासाठी नव्हे; एका देहापुरते नव्हे तर संपूर्ण जीवनामध्ये या जीवन जगण्याच्या पद्धतीला स्थान देण्यात आले. संपूर्ण विश्व एका चराचर चैतन्याने व्याप्त असल्याने सृष्टीच्या प्रत्येक प्राणिमात्रामध्ये, वस्तूमध्ये त्या चैतन्यास पाहणे, त्याकडे श्रद्धापूर्वक, आत्मीयतेने पाहणे, त्यांच्याशी मैत्रीपूर्ण व्यवहार करणे आणि परस्पर सहकायार्ने सर्वांचे जीवन चालेल हे पाहणे ही आमची जीवनपद्धती होती. आम्ही या निसगार्चे, प्रकृतीचे घटक आहोत. प्रकृतीपासून आपले पोषण करायचे आहे, असे आवाहन त्यांनी केले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*