सीमेवर आणखी सैन्य माघार नाहीच, भारताने चीनला ठणकावले


पूर्व लडाख सीमेवरील सैन्य आणखी माघारी घेण्यास भारताने चीनला स्पष्टपणे नकार दिला आहे. याबाबत चीनला ठणकावताना त्या ठिकाणीच दीर्घकाळ घट्ट पाय रोवून टिकून राहण्याची तयारी भारतीय लष्कराने सुरू केली आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पूर्व लडाख सीमेवरील सैन्य आणखी माघारी घेण्यास भारताने चीनला स्पष्टपणे नकार दिला आहे. याबाबत चीनला ठणकावताना त्या ठिकाणीच दीर्घकाळ घट्ट पाय रोवून टिकून राहण्याची तयारी भारतीय लष्कराने सुरू केली आहे.

भारत व चीन यांच्या वरिष्ठ लष्करी कमांडरांच्या काही दिवसांपूर्वी झालेल्या पाचव्या बैठकीत चीनने दोन्ही देशांनी सीमेवरील पॅनगाँग खोऱ्यात आपापले सैन्य समान प्रमाणात माघारी घेण्याचा प्रस्ताव मांडला. पण चीनने आधीच्या चर्चेत ठरल्याप्रमाणे त्यांचे सैन्य पूर्णपणे मागे घेतलेले नाही. उलट आपली विश्वासघाताची परंपरा कायम ठेवत चीनने भारताच्या तुलनेत अधिक सैन्य तुकड्या तैनात केल्या आहेत. त्यामुळे दोन्ही देशांनी सैन्यात समान प्रमाणात कपात करणार नाही, असे भारतीय कमांडरनी चीनला स्पष्ट शब्दांत बजावले आहे.

चीनच्या नव्या प्रस्तावावर उच्चस्तरीय चीन अभ्यासगटात यावर साकल्याने चर्चा झाली व हा प्रस्ताव अमान्य करण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार लडाखमधील लष्कराच्या ‘हॉटलाईन’वरून भारताचा नकार चीनला कळविला गेला. यावर चीनचे काय औपचारिक उत्तर येते हे पाहून नंतरची रणनीती ठरविली जाईल, असे लष्करी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

एप्रिल-मेच्या तुलनेत भारतानेही या सीमेवर अधिक सैन्य व रणगाडे आणि चिलखती वाहनांसह अधिक लष्करी कुमक तैनात केली आहे. हिवाळ्यात तेथे आणखी ३५ हजार सैन्य पाठविण्याची योजना आहे. या जय्यत तयारीनिशी भारतीय सैन्य चीन पुन्हा आपल्याला गाफील ठेवून कोणतेही नवे दुस्साहस करू शकणार नाही, याचा पक्का बंदोबस्त केला आहे.

भारतीय कमांडरांची बैठक सुमारे १० तास सुरू होती. त्यात प्रामुख्याने पॅनगाँग सरोवराच्या हद्दीवरून बराच काळ चर्चा झाली. त्या ठिकाणाहून दोन्ही बाजूंनी समान अंतराची माघार घ्यावी, असा चीनचा आग्रह होता. मात्र, तसे करणे म्हणजे त्या भागातील आधीपासूनच्या गस्ती चौक्या सोडून चीनच्या म्हणण्यानुसार सीमा मान्य केल्यासारखे झाले असते, म्हणून भारताने ठाम नकार दिला. आता कोणी किती माघार घ्यायची यापेक्षा चीनने आधी एप्रिल-मेपूर्वीची ‘जैसे थे’ स्थिती कायम करण्यावर भारताचा भर होता. आधीच्या बैठकींप्रमाणे या बैठकीनंतर दोन्ही देशांनी कोणतेही अधिकृत निवेदन प्रसिद्धीस दिले नाही. आता बहुधा हा तिढा सोडविण्यासाठी राजनैतिक पातळीवर चर्चा केली जाऊ शकेल.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था