सीमेवरील बांधकाम थांबवा, तरच तणाव निवळेल, भारताचा इशारा

चीनने सीमेवरील नवीन बांधकाम थांबवले तर भारत आणि चीन दरम्यान एलएसीवर (प्रत्यक्ष नियंत्रण रेषा) तणाव  संपुष्टात येईल, असा इशारा चीनमधील भारताचे राजदूत विक्रम मिस्त्री यांनी दिला आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : चीनने सीमेवरील नवीन बांधकाम थांबवले तर भारत आणि चीन दरम्यान एलएसीवर (प्रत्यक्ष नियंत्रण रेषा) तणाव संपुष्टात येईल, असा इशारा  चीनमधील भारताचे राजदूत विक्रम मिस्त्री यांनी दिला आहे.

भारतीय सैनिकांसोबत झालेल्या हिंसक झडपेनंतर गलवान खोऱ्यावर दावा करणाऱ्या चीनला भारताने कडक शब्दांत समज दिली आहे. चीनच्या या घुसखोरीच्या प्रयत्नांमुळे दोन्ही देशाच्या संबंधांवर वाईट परिणाम होऊ शकतो, असे म्हटले आहे.

चीनच्या गलवान खोऱ्यावरच्या दाव्याचं कधीही समर्थन केले जाणार नाही. कुरापती काढत असे दावे करण्याचा कोणताही फायदा होणार नाही. वास्तविक स्थिती बदलण्याचे चीनचे प्रयत्न जमिनीवर उभय देशांतील द्विपक्षीय संबंधांवर परिणाम करणारे ठरतील. द्विपक्षीय संबंधांच्या विकासासाठी सीमेवर शांतता स्थापित करणे गरजेचे आहे, असे मिस्त्री यांनी म्हटले आहे.

१५ जून रोजी गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांसोबत झालेल्या हिंसक चकमकीत भारताचे २० जवान शहीद झाले होते. त्यानंतर दोन्ही देशांदरम्यान वेगवेगळ्या स्तरावर चर्चा झाली. आणि दोन्ही देशांच्या सैन्याने मागे हटण्यावर सहमती दर्शवली. परंतु, त्यानंतरही समोर आलेल्या सॅटेलाईट फोटोंमधून चीनच्या सेनेनं मागे हटणं तर दूरच परंतु, आणखी भागांत आपला कब्जा करण्याची तयारी केल्याचं स्पष्टपणे दिसते आहे. याउलट भारतातील चीनच्या राजदूतांनी शांतता प्रस्थापित करण्याची जबाबदारी भारताची असल्याचं सांगत हात झटकण्याचा प्रयत्न केला होता.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*