विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पूर्व लडाखमधील भारतीय सैन्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी येत्या शुक्रवारी लडाख येथे जाणार आहे. लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणेदखील त्यांच्यासोबत असणार आहेत. चीनतर्फे चिनी सैन्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी अद्यापपर्यंत कोणीही फिरकलेले नाही, त्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांच्या लडाखभेटीस विशेष महत्व प्राप्त होते.
चीनसोबत राजनैतिक आणि लष्करी पातळीवर चर्चा सुरु असली तरीही पूर्व लडाखमध्ये भारतीय सैन्य कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास सज्ज आहे. सैन्याच्या सज्जतेचा आढावा घेण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह शुक्रवारी लडाख दौऱ्यावर जाणार असून लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणेदेखील त्यांच्यासोबत असणार आहेत. यावेळी राजनाथ सिंह हे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेस भेट देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याचप्रमाणे चीनसोबत झालेल्या हिंसक झटापटीत शौर्य गाजविणाऱ्या भारतीय सैन्याच्या जवानांचीही ते भेट घेणार असल्याचे समजते.
यापूर्वी एका आठवड्यापूर्वीच लष्करप्रमुख जनरल नरवणे यांनी लडाख दौरा केला होता. त्यापूर्वी वायुसेनाप्रमुख एअरचीफमार्शल आरकेएस भदौरिया यांनीदेखील लडाख दौरा केला आहे.
चर्चेच्या फेऱ्या सुरूच
पूर्व लडाखमध्ये गालवान खोऱ्यात चीनने केलेल्या आगळीकीनंतर दोन्ही देशांमध्ये ताणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सैन्य मागे घेण्याविषयी दोन्ही देशांमध्ये कमांडरस्तरीय चर्चा सुरू असून मंगळवारी चर्चेची ३ री फेरी पाडली. सुमारे ११ तास चाललेल्या चर्चेमधून अद्यापही समाधानकारक तोडगा निघालेला नाही. मात्र, शांतीपूर्वक टप्प्याटप्प्याने माघार घेण्याविषयी एकमत झाले आहे. चर्चेमध्ये दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्रालयांदरम्यान १७ जून रोजी झालेल्या कराराचे पालन करण्यात येत आहे. यापुढेही सैन्य आणि राजनैतिक स्तरावरील आणखी बैठका होतील, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.