वीज बिलांचा लूटमार पॅटर्न रद्द करण्याची आमदार रवींद्र चव्हाण यांची मागणी

  • मुख्यमंत्री ठाकरे यांना डोंबिवलीतून पाठवणार 25 हजार पत्रे

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महावितरण कंपनीने राज्यात वीज ग्राहकांना वीजबिलांचा शॉक देण्याचे सत्र चालूच आहे.  महावितरणने काल्पनिक गृहितकावर आधारित पाच पट वीजबिले ग्राहकांना पाठवली. कोरोना महामारीच्या काळात भाजपाने संयम राखून याबाबत अधिकाऱ्यांना भेटून निवेदने दिले. लोकशाही पद्धतीने आंदोलन केले. ही समस्या कल्याण-डोंबिवलीपुरता मर्यादीत नसून संपूर्ण महाराष्ट्रापुढचा हा गंभीर विषय आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात वीज बिलांचा लूटमार पॅटर्न ठाकरे सरकारने राबवला असून तो ततडीने थांबवण्यासाठी भाजपाचे प्रदेश सरचिटणीस, आमदार रवींद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 25 हजार पत्र डोंबिवलीतून पाठवण्याचे आवाहन केले आहे.

त्या पाठोपाठ उर्वरित ठाणे जिल्हा, कोकण भागातून पत्र पाठवावीत याची रचना लावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी पक्षाच्या प्रसिद्धी पत्रकात म्हंटल्याप्रमाणे उदासीन राज्य सरकार, लुटारू महावितरण कंपनी आणि ग्राहकहिताचं मुख्य उद्दिष्ट विसरलेला वीज आयोग यांनी एकत्रित येऊन ग्राहकांनाच ट्रॅप केले आहे.

मात्र या वीज बिलांच्या विळख्यातून ग्राहकांना सोडवल्याशिवाय भाजपा स्वस्थ बसणार नसल्याचे स्पष्ट।केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे समंजस आणि सूज्ञ आहेत असं भाजप समजत असल्याचे ते म्हणाले, पण त्यांना सर्वसामान्यांच्या वेदना क कळत नाहीत? ‘वर्क फ्रॉम होम’ मुळे वीज बिले वाढली हा हास्यास्पद पवित्रा त्यांनी मागे घ्यावा आणि त्याबरोबर भरमसाठ वीजबिलेही तात्काळ रद्द करून महाराष्ट्रातील वीज ग्राहकांना दिलासा द्यावा अशी मागणी चव्हाण यांनी केली.

त्यासाठी एक जागरूक वीज ग्राहक म्हणून प्रत्येकाने मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना वीज बिले रद्द करण्यासाठी एक पत्र पाठवूया अशी अपेक्षा त्यानी निवेदनाद्वारे केले आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*