रेल्वे करणार सौरशक्ती, पवनचक्क्यांद्वारे २० गिगावॅट वीजनिर्मिती, पियुष गोयल यांची माहिती

रेल्वेच्या मालकीच्या अतिरिक्त जमिनींवर सौरऊर्जा पॅनेल किंवा पवनचक्क्या बसवून त्याद्वारे २० गिगावॅट वीजनिर्मिती करण्याचा विचार आहे, असे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : रेल्वेच्या मालकीच्या अतिरिक्त जमिनींवर सौरऊर्जा पॅनेल किंवा पवनचक्क्या बसवून त्याद्वारे २० गिगावॅट वीजनिर्मिती करण्याचा विचार असल्याचे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले.

गोयल म्हणाले, येत्या काही वर्षांत देशातील रेल्वे जाळ्याचे १०० टक्के विद्युतीकरण पूर्ण होईल. त्यामुळे अशा प्रकारचे हे जगातील सर्वात मोठे रेल्वे जाळे होणार आहे.

कौन्सिल ऑन एनर्जी, एन्व्हॉयर्नमेंट अँड वॉटर (सीइइआय) या संघटनेने प्रदुषणविरहित ऊर्जानिर्मिती पर्यायांद्वारे भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेची प्रगती साधण्याबद्दल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आयोजिलेल्या परिसंवादात पीयूष गोयल बोलत होते.

गोयल यांनी सांगितले की, रेल्वे करणार असलेल्या वीजनिर्मितीच्या प्रयोगांचा अनेकांना फायदा होईल. या वीज साठवणूक करण्यासाठीही रेल्वेला यंत्रणा उभारावी लागणार आहे. १८५३ साली बोरीबंदर ते ठाणे दरम्यान भारतातील पहिली रेल्वे धावली. त्या घटनेला आता १६७ वर्षे झाली आहेत. मात्र, इतक्या कालखंडातही देशातील रेल्वेच्या जाळ्याचे संपूर्ण विद्युतीकरण होऊ शकलेले नाही. रेल्वे खात्याच्या ढिसाळ कारभाराला काँग्रेसची सरकारेच जबाबदार आहेत, असे म्हटले जाते.

पण भाजपच्या सत्ताकाळातही रेल्वे खाते अधिक सक्षम होण्यासाठी ठोस पावले पडताना दिसत नाहीत, अशी टीका विरोधी पक्षांकडून होत असते. चीनी व्हायरस साथीच्या काळात स्थलांतरित मजुरांना त्यांच्या गावी पोहोचविण्यासाठी रेल्वेने विशेष रेल्वे गाड्या सोडल्या. मात्र, त्यातही काही राज्यांनी अडचणी आणल्या.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*